शालेय पोषण आहार, विद्यार्थ्यांना भातासोबत मिळणार दुधाची भुकटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:58 AM2018-08-26T00:58:53+5:302018-08-26T00:59:17+5:30

शालेय पोषण आहार : प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यांसाठी समावेश

School nutrition, Milk powders will be provided to students with rice | शालेय पोषण आहार, विद्यार्थ्यांना भातासोबत मिळणार दुधाची भुकटी

शालेय पोषण आहार, विद्यार्थ्यांना भातासोबत मिळणार दुधाची भुकटी

Next

नीरा : राज्यात अतिरिक्त झालेल्या दूध व दुधाच्या भुकटीच्या संदर्भात शासनाने उपयोजनांना सुरुवात केली आहे. याअंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर इयत्ता १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेच्या अंतर्गत दुधाची भुकटी देण्याचा निर्णय नुकताच शिक्षण विभागाने घेतला आहे. जिल्ह्यातील पोषण आहार योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व शाळांना याचा लाभ होणार असून, तीन महिन्यांकरिता हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती टिकावी; तसेच गळतीची समस्या दूर होऊन विद्यार्थ्यांना सकस अन्न मधल्या सुटीत मिळावे यासाठी शासनाने प्राथमिक स्तरावर शालेय पोषण आहार योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत मूगडाळ, तूरडाळ, मटकी, हरभरा, वाटाणा आदी कडधान्यांची उसळ किंवा खिचडीभात वेळापत्रकाप्रमाणे तयार केला जातो. यात आता शासनाच्या निर्णयाने दुधाच्या भुकटीची वाढ झाली आहे. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्नाटक राज्यातील ‘क्षीर भाग्य योजनेचा’ अभ्यास करून शालेय विद्यार्थ्यांना भुकटी वाटप करण्यावर शिक्केमोर्तब करण्यात आले. या निर्णयास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, पूरक योजना कार्यान्वित करण्यासाठी शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक या समितीचे सचिव म्हणून कामकाज पाहणार आहेत. दुधाच्या भुकटीपासून तयार करण्यात आलेले दूध विद्यार्थ्यांना देणे अपेक्षित असून, एका विद्यार्थ्याला एक महिन्यासाठी २०० गॅ्रम भुकटीचे एक पाकीट याप्रमाणे तीन महिन्यांसाठी प्रत्येक विद्यार्थ्याला तीन पाकिटे देण्यात येणार आहेत. भुकटीपासून पालकांनी घरी दूध तयार करून देणे अपेक्षित असल्याचे निर्णयात नमूद करण्यात आले आहे. दुधाच्या भुकटीचे वाटप एकाच दिवशी करण्यात येणार असून, हा दिवस ‘दूध भुकटी वाटप दिवस’ म्हणून जाहीर करण्यात येणार आहे.

अतिरिक्त दुधाबाबत शासनाने घेतलेला निर्णय व्यवहार्य वाटत असला, तरी मुलांना घरी दूध तयार करून दिले जाईल याबाबत साशंकता आहे. अंगणवाडीकेंद्रांना गर्भवती मातांसाठी पुरविले जाणारे पूरक आहाराची अशी अनेक पाकिटे जनावरांना खाऊ घातल्याचे अनेकदा निदर्शनास आलेले आहे.

ग्रामीण भागात आजही ताज्या दुधाला जितके महत्त्व आहे तितके दुधाच्या भुकटीला नाही. त्यामुळे पालक हा उपक्रम कशाप्रकारे मनावर घेतात यावर या बदलाचे भवितव्य अवलंबून आहे. पालकांना दुधाच्या भुकटीपासून दूध कसे बनवायचे, याबाबतच्या सविस्तर सूचनाही शाळा प्रशासनाने याच दिवशी द्यायच्या आहेत. दरम्यान, या योजनेअंतर्गत पुरविण्यात येणारी भुकटी राज्यात उत्पादित केलेली असावी, अशी अट घालण्यात आली आहे.
 

Web Title: School nutrition, Milk powders will be provided to students with rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.