वाटलूज शाळेचे मुख्याध्यापक निलंबित
By admin | Published: May 13, 2014 02:41 AM2014-05-13T02:41:01+5:302014-05-13T02:41:01+5:30
येथील वाटलूज जिल्हा परिषद शाळेतील तत्कालीन मुख्याध्यापक कृष्णा वैराट यांना निलंबित केले
दौंड : येथील वाटलूज जिल्हा परिषद शाळेतील तत्कालीन मुख्याध्यापक कृष्णा वैराट यांना निलंबित केले असून, त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष हराळे यांनी दिली. मुख्याध्यापक वैराट यांनी २ लाख ४० हजारांचा अपहार केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवार (दि.६) रोजी प्रसिद्ध केले होते. या संदर्भात शालेय व्यवस्थापन समिती आणि काही ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. शिक्षण विस्तार अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांनी चौकशी केली. त्यात वैराट हे दोषी आढळले. त्यानुसार त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शाळेतील शासकीय अभिलेखे अपूर्ण असणे, २0१२-१३ मध्ये वैराट यांच्या वर्गाचे कामकाज पाहण्यासाठी गावातील डी.एड. झालेल्या मुलीची परस्पर नेमणूक करणे, शालेय पोषण आहार अंतर्गत विद्यार्थ्यांना पूरक पोषण आहार दिल्याचे वाटप रजिस्टर न ठेवणे, ए.बी.एल. साहित्याचा अध्ययन, तसेच अध्यापनासाठी वापर न करणे, शिक्षकांबरोबर असहकार्याची वृत्ती, स्वच्छतागृह बांधकाम मंजूर नकाशाप्रमाणे मंजूर करण्यात आले नाही. स्वच्छतागृहात पाण्याची व्यवस्था नाही. स्वच्छतागृहाचे चार इंची बांधकाम करण्यात आलेले नाही. त्यामुळे सदरचे बांधकाम शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी धोकादायक आहे. (वार्ताहर)