शाळा, विद्यार्थी घ्या; पण शिक्षक देण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:10 AM2021-07-11T04:10:16+5:302021-07-11T04:10:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्हा परिषदेच्या हद्दीतील जवळपास ३४ गावांचे महापालिकेत समायोजन झाले. या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्हा परिषदेच्या हद्दीतील जवळपास ३४ गावांचे महापालिकेत समायोजन झाले. या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा, विद्यार्थी पालिकेमध्ये समाविष्ट होणार आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांनाही समाविष्ट करून घेण्यासाठी त्यांचे शिष्टमंडळ नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहे. मात्र, जिल्हा परिषदेतच विविध कारणांमुळे शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने तसेच राईट टू एज्युजेशन ॲक्ट २६ नुसार या शिक्षकांना पुणे मनपात समाविष्ट करण्यास मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी नकार दिला आहे. यामुळे जवळपास ५१९ शिक्षकांच्या महापालिकेत समाविष्ट होण्याच्या आशा मावळल्या आहेत.
सुरुवातीला ११, तर काही दिवसांपूर्वी जवळपास २३ गावांचा समावेश पुणे महानगरपालिकेत झाला. यामुळे येथील ग्रामपंचायत कार्यालयाची दफ्तरे, शाळा, विद्यार्थी तसेच आदी सुविधा महापालिकेत वर्ग झाल्या. त्याच बरोबर या ३४ गावांतील ६४ शाळांतील जवळपास १८ हजार ३९६ विद्यार्थ्यांचाही समावेश महापालिकेत करण्यात आला. विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांचेही महापालिकेत समायोजन व्हावे यासाठी त्यांचे शिष्टमंडळ जिल्हा परिषद तसेच नेत्यांकडे चकरा मारत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून अनेक कारणांमुळे जिल्हा परिषदेतील शिक्षकांची संख्या कमी झाल्याने या शिक्षकांचे पुणे महानगर पालिकेत समायोजन करण्यास नकार देण्यात आला आहे.
२०१५ पासून जिल्हा परिषदेत शिक्षक भरती प्रक्रिया रखडली आहे. त्यात टीईटीची प्रक्रिया सुद्धा रखडल्याने नव्याने शिक्षक मिळणे कठीण झाले आहे. त्यात अनेक शिक्षक निवृत्त होत असल्याने शिक्षकांची संख्या ही कमी होत आहे. त्यात या वर्षी जिल्हा परिषद शाळेत नव्याने पाचवी, सहावी आणि सातवीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्या तुलनेत शिक्षकांची संख्या कमी आहे. त्यात ३५० पेक्षा जास्त शालाबाह्य विद्यार्थी जिल्ह्यात आढळले असल्यामुळे ३० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक असे नव्याने १० शिक्षकांची पदे तयार झाली आहे. या सर्व कारणांमुळे जवळपास १० टक्के शिक्षकांची पदे ही रिक्त आहे. यामुळे राईट टू एज्युकेशन ॲक्टच्या सेक्शन २६ नुसार शिक्षकांचे समायोजन करता येणार नसल्याने हे सर्व शिक्षक जिल्हा परिषदेतच राहणार आहेत.
कोट
मनपामध्ये समायोजन होण्यासाठी अनेक शिक्षकांची शिष्टमंडळे भेटी देत आहेत. तर अनेक शिक्षक हे बदली प्रक्रियेत आहेत. यात संवर्ग १ च्या शिक्षकांची संख्या मोठी आहे. या सर्व शिक्षकांच्या अडचणी आम्हाला मान्य आहेत. त्याची तपासणीही करण्यात आली आहे. या शिक्षकांना जास्त त्रास होऊ नये असा आमचा प्रयत्न आहे. त्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहेत. पण मुळातच जिल्हा परिषदेकडे रिक्तपदे जास्त असल्याने राईट टू एज्युकेशन ॲक्टच्या २६ सेक्शन नुसार शिक्षकांचे समायोजन महापालिकेत करता येणार नाही.
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
चौकट
पुणे महापालिकेत ३४ गावांचा समावेश झाला आहे. या गावातील जवळपास जिल्हा परिषदेच्या ६४ शाळा आहेत. त्यात जवळपास १८ हजार ३९६ विद्यार्थी तर ५१९ शिक्षक आहेत. या शाळा विद्यार्थी महापालिकेत समाविष्ट झाले आहेत. मात्र, शिक्षक हे जिल्हा परिषदेतच राहणार आहेत.