शाळेला सुट्टी आता गावाला जाऊया! राज्यात उन्हाळी सुट्टीसाठी जादा बस धावणार
By नितीश गोवंडे | Published: April 13, 2023 02:50 PM2023-04-13T14:50:08+5:302023-04-13T14:50:30+5:30
पुणे एसटी विभागाने उन्हाळी विशेष एसटी बसचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले
पुणे : उन्हाळी सुट्ट्या लक्षात घेता, पुणे एसटी विभागाने देखील उन्हाळी विशेष एसटी बसचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले. १० एप्रिल ते १५ जून दरम्यान राज्यातील वेगवेगळ्या गावांसह शहरांमध्ये एसटीच्या जादा बस धावणार आहेत.
यामध्ये शिवाजीनगरहून (वाकडेवाडी) लातूर, नंदुरबार, धुळे, अकोला आणि बीड या शहरांसाठी दोन-दोन जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. तर स्वारगेट बस स्थानकावरून विजापूर, गाणगापूर, गणपतीपुळे, श्रीवर्धन आणि सोलापूर या मार्गांवर देखील जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवड बस स्थानकावरून चिपळूण आणि शेगाव साठी दोन दोन अतिरिक्त बस सोडण्यात आल्या आहेत.
याव्यतिरिक्त स्वारगेट-बोरिवली, ठाणे, दादर, सोलापूर, कल्याण, पंढरपूर यासह पुणे स्टेशन - दादर, शिवाजीनगर (वाकडेवाडी) - छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, लातूर, अकोला, सोलापूर, भीमाशंकर, बोरीवली या मार्गांवर दर अर्ध्या तासाने एसटीच्या फेऱ्या सुरू आहेत. तरी प्रवाशांनी एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा तसेच खाजगी वाहतुकीच्या मार्गाने प्रवास टाळावा असे आवाहन, पुणे एसटी विभागाचे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी केले.