"संजय अंकल अश्लील कृत्य करतात"; पुण्यात व्हॅन चालकाचा चिमुकल्यांसोबत घृणास्पद प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 02:05 PM2024-10-03T14:05:14+5:302024-10-03T14:05:47+5:30
बदलापूर अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच पुण्यात दोन मुलींसोबत अश्लिल चाळे करणाऱ्या व्हॅन चालकाला अटक करण्यात आली आहे.
Punc School Van Crime : बदलापुरच्या नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे हा एन्काऊंटरमध्ये मारला गेला. मात्र यानंतरही अत्याचाराच्या घटना समोर येत असून राज्यातील मुली सुरक्षित नसल्याचे म्हटलं जात आहे. पुण्यात दोन शाळकरी मुलींसोबत अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅन चालकाकडून शाळकरी मुलींसोबत गैरप्रकार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी व्हॅन चालकाला अटक केली आहे.
पुण्यात स्कूल व्हॅनमध्ये चालकाने दोन मुलींसोबत अश्लील चाळे केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या वानवडी परिसरात ३० सप्टेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली. आरोपी व्हॅन चालक पीडित मुलींना गाडीच्या पुढच्या सीटवर बसवून त्याच्यांसोबत अश्लील चाळे करत होता. एका पीडित मुलीने तिच्या वडिलांना हा प्रकार सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याबाबत पीडित मुलीच्या आईने वानवडी पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी याप्रकरणी संजय जेटींग रेड्डी नावाच्या आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे.
चार दिवसांपूर्वी पीडित मुलगी शाळेतून घरी आली तेव्हा तिने वडिलांकडे तक्रार केली होती. त्यानंतर वडिलांनी विश्वासात घेऊन मुलीकडे विचारणा केली असता तिने संजय अंकल अश्लील कृत्य करत असल्याचे सांगितले. संजय अंकल माझ्याबरोबर असणाऱ्या मैत्रिणीबरोबर अश्लील कृत्य करतात, असे पीडिततेने वडिलांना सांगितले. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी तिच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन या प्रकाराबाबत माहिती दिली. दुसऱ्या मुलीनेही पालकांना संजय अंकल अश्लील कृत्य करत असल्याची माहिती दिली. त्यानंतर मुलीच्या आईने याप्रकरणी वानवडी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपी व्हॅन चालक संजय रेड्डीला अटक केली.
या सगळ्या प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. "शाळेच्या व्हॅनमध्ये चालकाने मुलींना चुकीच्या पद्धतीने हात लावला. एका मुलीच्या पालकांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर आणखी एका मुलीला त्याने अशाच प्रकारे हात लावल्याचे समोर आले आहे. म्हणून त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थाचालकांनाही याप्रकरणी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे," असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तसेच या प्रकरणात आरोपीला पळून जाण्यासाठी मदत करण्यात आल्याचेही फडणवीस म्हणाले. "पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत असे लक्षात आले की, स्थानिक काही नेत्यांनी त्याला पळून जाण्यात मदत केलेली आहे. अशा प्रकारच्या घटनांमध्ये मी काही राजकीय पक्ष वैगरे बघत नाही. आरोपी हा आरोपीच असतो. अशा आरोपीवर कडक कारवाई केली जाईल. तसेच आरोपीला मदत करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येईल," असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.