आता ठराविक थांब्यांवरच थांबवता येणार स्कुल व्हॅन : पोलिसांनी ठरवले १०८ स्पॉट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 08:29 PM2019-08-02T20:29:33+5:302019-08-02T20:31:28+5:30
शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कुल बस व व्हॅनसाठी थांबे निश्चित करण्यात आले आहेत. शहरात एकुण १०८ थांब्यांना मान्यता देण्यात आली आहे.
पुणे : शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कुल बस व व्हॅनसाठी थांबे निश्चित करण्यात आले आहेत. शहरात एकुण १०८ थांब्यांना मान्यता देण्यात आली आहे. हे सर्व थांबे शाळांच्या परिसरात असून या थांब्यांव्यतिरिक्त बस व व्हॅनला इतरत्र थांबून विद्यार्थ्यांची चढ-उतार करता येणार नाही.
महाराष्ट्र मोटार वाहन (स्कुल बस) २०११ चा नियम ६ मधील तरतुद आणि उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार स्कुल बस व व्हॅनचे थांबे निश्चित करण्यात आले आहेत. याबाबत पुणे जिल्हा स्कुल बस सुरक्षितता समितीची दि. ३ जुलै रोजी बैठक घेण्यात आली होती. याबैठकीमध्ये समितीचे अध्यक्ष पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी परिवहन विभाग, वाहतुक पोलिस, महापालिका व शिक्षण विभागाला संयुक्त सर्वेक्षण करून थांबे निश्चित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार संबंधित विभागांनी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये पाहणी केली, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.
पाहणीमध्ये संबंधित शाळा मुख्याध्यापकांशी चर्चा करून थांबे निश्चित करण्यात आले आहेत. शाळांच्या आवारामध्ये बस, व्हॅन उभी करण्यासाठी जागा उपलब्ध असल्यास तिथेच थांबा ठेवण्यात आला आहे. तर ज्या शाळांना जागा उपलब्ध नाही, त्यांना रस्त्यालगत वाहने उभी करण्यासाठी थांबे दिले आहेत. याबाबत संबंधित मुख्याध्यापकांकडून जागेबाबत विचारणा करण्यात आली. तसेच रस्त्यावर होणाऱ्या वाहतुक कोंडीचाही विचार करण्यात आला. त्याानंतरच जागा अंतिम करण्यात आल्याचे परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. या पाहणीनंतर पुणे शहरात १०८, पिंपरी चिंचवडमध्ये ३९ तर बारामती कार्यक्षेत्रामध्ये १३ थांबे निश्चित करण्यात आले आहेत. गरजेनुसार पुढील काळातही थांबे वाढविण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने या थांब्यांना दि. ३१ जुलै रोजी मान्यता दिली आहे. तर थांब्यांच्या ठिकाणी फलक लावण्याबाबत महापालिकेच्या पथ विभागाला कळविण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.
शाळा भरण्याच्या व सुटण्याच्यावेळी शहरातील अनेक शाळांसमोर रस्त्यावर व्हॅन व बसच्या रांगा लागतात. अनेकदा जागेअभावी दुतर्फा वाहने उभी केली जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी होते. काही चालकांकडून त्याकडे दुर्लक्ष करून कशाही प्रकारे वाहने उभी केली जातात. त्यामुळे कोंडीत अधिक भर पडते. ही बाब विचारात घेऊन बस व व्हॅनचे शाळांच्या ठिकाणी थांबे निश्चित करण्यात आले आहेत. याठिकाणीच वाहने उभी करावी लागणार आहेत. रिक्षांसाठी मात्र थांबे करण्यात आलेले नाहीत. भविष्यात त्यांना थांबे दिले जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. थांब्यांमुळे बस, व्हॅनला शिस्त लागून वाहतुक कोंडीही होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. महापालिकेकडून फलक बसविण्याची कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर लगेचच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.