पहिल्याच दिवशी शाळेला टाळे
By admin | Published: June 16, 2017 04:38 AM2017-06-16T04:38:12+5:302017-06-16T04:38:12+5:30
अनेक तक्रारी असलेल्या प्रभारी मुख्याध्यापिकेच्या निषेधार्थ करंजविहिरे (ता. खेड) येथील थोपटवाडीच्या संतप्त झालेल्या नागरिकांनी आज शाळा सुरु होण्याच्या
- लोकमत न्यूज नेटवर्क
आंबेठाण : अनेक तक्रारी असलेल्या प्रभारी मुख्याध्यापिकेच्या निषेधार्थ करंजविहिरे (ता. खेड) येथील थोपटवाडीच्या संतप्त झालेल्या नागरिकांनी आज शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी शाळेला टाळे ठोकले.
मागील कित्येक महिने शाळेच्या मुख्याध्यापक ए. ए. कोल्हे यांचा मनमानी कारभार आमच्या गावच्या शाळेत सुरु असून अनेक वेळा त्यांच्या वरिष्ठांना विनंती करून देखील काहीही बदल न झाल्याने आज अखेर शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी आम्ही शाळेला कुलूप ठोकत असल्याचे ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
करंजविहीरे हे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील मोठे गाव असून थोपटवाडी ही त्या गावची सर्वात मोठी वाडी आहे. येथे जिल्हा परिषदेची शाळा असून शाळेत जवळपास दीडशे विद्यार्थी शिक्षण घेत आहे. परंतु या शाळेतील शिक्षिका कोल्हे या शाळेत अतिशय मनमानी कारभार करीत असल्याची तक्रार आहे. या शिक्षिकेची तत्काळ बदली करावी आणि शाळेतील रिक्त असणाऱ्या जागा भराव्यात यासाठी आज शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी आंदोलन करून निषेध व्यक्त केला. शाळेच्या कार्यालयाला आणि अन्य वर्गांना टाळे ठोकले.
मनमानी कारभाराच्या विरोधात यापूर्वी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्हा उपशिक्षण अधिकारी संजय नाईकडे, गटशिक्षण अधिकारी सोपान वेताळ, शिक्षण विस्तार अधिकारी एल.बी. शिनगारे आणि केंद्र्रप्रमुख मारुती कांबळे यांनी प्रत्यक्ष शाळेत येऊन पाहणी केली होती आणि शिक्षिकेला १५ दिवसांत सुधारण्याची समज दिली होती. परंतु याप्रसंगी सरपंच गणपत कोळेकर, माजी सरपंच शांताराम कोळेकर, ग्रामपंचायत सदस्य सुदाम कोळेकर, राधाबाई कलवडे, रमेश कोळेकर आदी उपस्थित होते.
याबाबत कोल्हे यांच्याशी संपर्क साधला असता मला मनमानी कारभार करायचा नाही असे उत्तर त्यांनी दिले. शिक्षण विस्तार अधिकारी एल. बी. शिनगारे यांनी शाळा सुरू ठेवण्याची विनंती केली
या शाळेत जवळपास १५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यासाठी केवळ दोनच शिक्षक असून, एक शिक्षक करंजविहिरे येथील शाळेतून येत आहे. येथे शाळादेखील १ ली ते ७ वीपर्यंत आहे. त्यामुळे एवढ्या मुलांना हे शिक्षक शिकवणार तरी कसे ? असा सवाल निर्माण होत आहे. या शाळेतील रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे.
शिक्षण अधिकाऱ्यांनी विनंती केल्यानंतरदेखील ग्रामस्थांनी शाळा पुन्हा सुरू करण्यास नकार दिला. संबंधित शिक्षिकेवर कारवाई झाल्यानंतरच शाळा सुरू केल्या जातील, असे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.