शिक्षकेतर कर्मचा-यांचे ९ जुलैपासून राजव्यापी धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 03:57 PM2018-07-07T15:57:52+5:302018-07-07T15:58:06+5:30
शिक्षकेतर कर्मचारी यांच्या भरतीवर गेल्या १५ वर्षापासून बंदी असल्यामुळे शाळांतील प्रशासकीय व त्या अनुषंगाने कामे ठप्प झाली आहेत.
पुणे : राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचा-यांच्या अनेक मागण्या गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहेत. शासनाने दरवेळी आश्वासने देवून शिक्षकेत्तर कर्मचा-यांची बोळवण केली आहे. सरकार कर्मचारी आणि संघटना यांची दिशाभूल करत असून त्याच्या निषेधार्थ सोमवार यशवंत स्टेडियम नागपूर येथे पावसाळी अधिवेशन काळात राजव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी दिली.
शिक्षकेतर कर्मचारी यांच्या भरतीवर गेल्या १५ वर्षापासून बंदी असल्यामुळे शाळांतील प्रशासकीय व त्या अनुषंगाने कामे ठप्प झाली आहेत. याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून मोर्चा, धरणे, घंटानाद, झोपमोड आंदोलने, उपोषण अशा प्रकारची वेगवेगळी आंदोलने केली असून शाळेत कर्मचारीच नसल्याने शालेय कामकाज करणे अवघड झाले आहे. माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील बंदी उठवून शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी शासनाने नेमलेल्या समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यात यावी, केंद्र व राज्य शासनाप्रमाणे शिक्षकेतरांना २४ वर्षानंतरची दुसरी कालबध्द पदोन्नती विना अट त्वरीत लागू करावी, चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची अतिप्रदान रक्कम वसुली थांबविण्यात यावी आणि राज्यातील शिक्षकेतर कर्मचा-यांच्या अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांना तात्काळ मान्यता देण्यात याव्यात. आदी मागण्या संघटनेच्या असून या आंदोलनास राज्यभरातून सर्व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
.......................................