शाळाही बंदच आणि पाच दिवस शिक्षणही बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:13 AM2021-09-14T04:13:22+5:302021-09-14T04:13:22+5:30
------------- पुणे : सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे ॲनलाईनच्या माध्यमातून मुलांचे शिक्षण सुरू राहावे यासाठी शासन आणि काही शाळा ...
-------------
पुणे : सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे ॲनलाईनच्या माध्यमातून मुलांचे शिक्षण सुरू राहावे यासाठी शासन आणि काही शाळा धडपडत आहेत. विशेषत: ग्रामीण भागातील शिक्षक, तर मुलांना घरापर्यंत जाऊन वाड्यावस्त्यांवर मुलांचे गट करून शिकवत आहेत, एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे पुणे शहरात काही शाळांनी मात्र सणावाराला जोडून स्वत:च्या अधिकारातील सुट्ट्या वापरत तब्बल पाच पाच दिवस शाळेला सुट्ट्या देत शाळेबरोबर मुलांचे ऑनलाईन शिक्षणही बंद ठेवले आहे त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचे तीनतेरा झाले आहेत.
गणेश विसर्जनाच्या दिवशी शासकीय नियमानुसार शाळेला सुट्टी असते. मात्र काही शाळांनी गणेशजयंतीच्या आदल्यादिवशीच्या हरतालिका (ता. ९ सप्टेंबर) सणापासून सुट्ट्या घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर शुक्रवारी गणेश चतुर्थी त्यानंतर शनिवारी ॲडजस्ट केलेली सुट्टी, रविवारी साप्ताहिक सुट्टी आणि सोमवारी गौरीपूजन सारख्या सणाची सुट्टी घेत सलग पाच दिवस शाळेसह ऑनलाईन शिक्षणालाही सुट्टी दिली.
एकीकडे खासगी शाळा मुलांचे ऑनलाईनचे तास वाढविण्याबरोबरच शाळा सुरू करण्यासाठी शासनाकडे वारंवार मागणी करत असताना दुसरीकडे अनुदानित शाळांनी मात्र सुट्यांचा धडाका सुरू केला आहे. शाळेत मुलेच येत नसल्याने तुलनेने कामाचा ताण कमी झाला आहे. शिवाय, सर्व तुकड्यांचे एकत्रित ऑनलाईन वर्ग घ्यायचे असल्याने तासिकांचा वर्कलोडही कमी झाला आहे. असे असतानाही शाळांनी थेट पाच दिवस सुट्ट्या घेतल्याने पालक व विद्यार्थी वर्गामधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
---------
कोरोना महामारीच्या काळात मुलांचे होत असणारे शैक्षणिक नुकसान पाहता शाळांनी सलग सुट्ट्या घेऊ नये. शासकीय सुट्ट्यांच्या यादीमध्ये हरतालिका, गौरी आवाहन, गौरी विसर्जनाची सुट्टी नसते तरी देखील काही शाळांनी त्यांच्या पातळीवर सट्ट्या घेतल्या असतील तर त्या कोणत्या अधिकारात घेतल्या याबाबत निश्चितपणे चौकशी केली जाईल. शाळांच्या अधिकारात वर्षभरात त्यांना दोन सुट्ट्या घेण्याचा अधिकार आहे, तरी सध्याची परिस्थिती पाहता मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- अपर्णा वाखारे,
शिक्षणाधिकारी, पुणे
--------
आमच्या शाळेत महिला शिक्षकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे गौरी आवाहन -पूजन या सुट्ट्या आम्ही दरवर्षी घेतो. महात्मा गांधी जयंतीला आम्ही शाळेत कार्यक्रमासाठी येतो त्यामुळे त्याची सुट्टी आम्ही ॲडजस्ट करत असतो, मात्र त्याची रितसर परवानगी आम्ही काढतच असतो.
प्रभा शांडगे,
महिलाश्रम हायस्कूल, पुणे
-------------------