शाळा होणार सुरू, मग महाविद्यालये का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:12 AM2021-07-14T04:12:50+5:302021-07-14T04:12:50+5:30
स्टार डमी ९१३ पुणे : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येत असल्याने राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत चाचपणी ...
स्टार डमी ९१३
पुणे : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येत असल्याने राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत चाचपणी केली जात आहे. त्यामुळे केवळ शाळाच का? महाविद्यालयेसुद्धा का सुरू केली जात नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कमीत कमी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसाठी (प्रॅक्टिकल्स) महाविद्यालयात येण्यास परवानगी देण्याबाबत शासनाने विचार करावा, अशी अपेक्षा प्राचार्यांनी व्यक्त केली आहे
राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत राज्याच्या शिक्षण विभागातर्फे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात सुमारे ८० ते ८५ टक्के पालकांनी शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली. परंतु, शाळा सुरू होत असली तर पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनासुध्दा महाविद्यालयात बोलवून ऑफलाईन पध्दतीने शिक्षण द्यायला हवे, अशा प्रतिक्रिया शिक्षण विभागाकडून व्यक्त झाल्या आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एक महिनाभर तरी महाविद्यालये सुरू होणार नसल्याचे तूर्तास स्पष्ट केले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या मोठी असून काही महाविद्यालयांत कला, वाणिज्य व विज्ञान शाखेसाठी चार ते पाच तुकड्या आहेत. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना शाळेत बोलावणे शक्य नाही. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी घरी आहेत. त्यांना प्रॅक्टिकलसाठी कोणती उपकरणे कशी हाताळावीत,याबाबत कल्पना नाही. काही विषयांतील घटकांचे प्रत्यक्षात प्रॅक्टिकल केल्याशिवाय संबंधित संकल्पना नीटपणे समजत नाही. त्यामुळे एक महिन्यानंतरही महाविद्यालयेसुध्दा सुरू करण्याबाबत विचार व्हावा, अशी अपेक्षा शिक्षण विभाग व्यक्त करत आहे.
----------------------
पुणे, नगर, नाशकातील एकूण महाविद्यालये व विद्यार्थी
कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयांची संख्या : ६५०
तीनही जिल्ह्यांतील एकूण विद्यार्थी : १ लाख ७५ हजार
----------------
कोरोनासंदर्भातील शासकीय नियमांचे पालन करून केवळ अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसाठी महाविद्यालयात बोलवता येऊ शकते का? याबाबत विचार होण्याची आवश्यकता आहे. इयत्ता बारावी, टी.वाय.बी.एस्सी. आणि एम.एस्सी, अभ्यासक्रमाच्या १० ते १५ विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसाठी बोलवले तर महाविद्यालयांना याबाबत नियोजन करता येऊ शकते.
- डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर
------------------------------------------
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करता त्यांना काही विषयाच्या मूलभूत संकल्पना माहीत होणे गरजेचे आहे. त्यामुळे कमीत कमी प्रात्यक्षिकांसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करून प्रवेश देता येईल का? याबाबत शासनाने विचार करायला हवा.
- डॉ. के. सी. मोहिते, प्राचार्य, सी. टी. बोरा महाविद्यालय, शिरूर
------------------
कोरोना विषय परिस्थितीत सुधारणा झालेल्या ठिकाणी महिनाभरानंतर महाविद्यालये सुरू करता येणे शक्य आहे का, याबाबत चाचपणी करून करून मर्यादित संख्येत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसाठी महाविद्यालयात पाठविण्याबाबत शासनाने विचार करावा,अशी अनेक प्राध्यापकांची अपेक्षा आहे.
- डॉ. एम. जी. चासकर, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ