शाळांच्या बस सुरू होणार
By admin | Published: July 1, 2017 08:05 AM2017-07-01T08:05:04+5:302017-07-01T08:05:04+5:30
विद्यार्थी वाहतुकीसाठीच्या बसच्या दरात केलेली वाढ मागे घेण्यास पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी अखेर मान्यता दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विद्यार्थी वाहतुकीसाठीच्या बसच्या दरात केलेली वाढ मागे घेण्यास पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी अखेर मान्यता दिली. हा दर १४१ रुपयांवरून ६६ रुपये करण्यात येणार आहे. या दरामधील तफावत महापालिकेच्या वतीने नेहमीप्रमाणे पीएमपीला देण्यात येणार आहे.
शाळांना न कळवता तसेच संचालक मंडळाची मान्यता न घेताच मुंढे यांनी शाळा सुरू होण्याच्या ऐन एक दिवस आधी शाळांसाठीच्या बसच्या दरात प्रतिकिलोमीटर वाढ केली. काही शाळांनी जादा दर स्वीकारून बस सुरू ठेवल्या, मात्र काही शाळांनी बससेवा बंद केली. त्याचा विद्यार्थी संख्येवर परिणाम झाला. या विषयावर चर्चा करण्यासाठी म्हणून महापौर मुक्ता टिळक यांनी बैठकीसाठी मुंढे यांना बोलावले पण ते या बैठकीला आलेच नाहीत, त्यावरून बराच गदारोळ उडाला.
शुक्रवारी महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, मुंढे, त्रिंबक धारूरकर आदी या बैठकीला उपस्थित होते. विद्यार्थी वाहतुकीसाठीचा वाढवलेला दर कमी करण्याची तयारी मुंढे यांनी दर्शवली. त्यामुळे शनिवारपासूनच या बस सुरू होतील अशी माहिती भिमाले यांनी दिली. पीएमपी सेवेत सुधारणा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करून महापौर टिळक यांनी मुंढे यांना काही सूचना केल्या. त्यानुसार सुधारणा करण्याचे त्यांनी मान्य केले.