‘भारत बंद’मुळे शाळांचा उडाला गोंधळ, काही बंद, तर काही ठिकाणी लवकर सोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 01:10 AM2018-09-11T01:10:36+5:302018-09-11T01:10:47+5:30
विरोधी पक्षांच्या वतीने सोमवारी पुकारण्यात आलेल्या भारत बंददरम्यान शाळांना सुट्टी द्यायची की शाळा सुरू ठेवायच्या यावरून शाळांमध्ये गोंधळ उडाला.
पुणे : विरोधी पक्षांच्या वतीने सोमवारी पुकारण्यात आलेल्या भारत बंददरम्यान शाळांना सुट्टी द्यायची की शाळा सुरू ठेवायच्या यावरून शाळांमध्ये गोंधळ उडाला. काही शाळांनी सुट्ट्या दिल्या तर काहींनी सोमवारी शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र सकाळी एका शाळेच्या स्कूलबसवर दगडफेक झाल्याचे समजताच अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना लवकर सोडण्यात आले.
रविवारी सायंकाळी भारत बंद राहणार असल्याच्या बातम्या दाखविल्या जाऊ लागल्या. त्या वेळी सोमवारी शाळा सुरू राहणार आहे का याची विचारणा अनेक पालकांनी शाळांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरून शिक्षकांकडे केली होती. मात्र अनेक शाळा प्रशासनांनी शाळा सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे पालकांनी मुलांना शाळेला पाठविले. मात्र सकाळी बंदची तीव्रता वाढू लागल्यानंतर अर्ध्यातूनच शाळा सोडण्यात आल्या, त्यामुळे विद्यार्थी व पालकांची मोठी गैरसोय झाली. अनेक ठिकाणी स्कूलबस न आल्याने विद्यार्थी शाळेला जाऊ शकले नाहीत, त्यामुळे बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होती.
सायंकाळी सहानंतर बंद मागे घेतला जाणार असल्याने स्प्रिंगडेल शाळेने मुलांना सायंकाळी सहानंतर घरी पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्व पालकांना फोन व
मेसेज करून आपल्या पाल्यांना संध्याकाळी सहानंतर सोडण्यात
येईल असे सांगितले. त्यामुळे
मुलांना उशिरापर्यंत शाळेत ताटकळत राहावे लागले.
हुजूरपागा, हचिंग्स स्कूल, विबग्योअर स्कूल, सिंहगड, बिशप्स स्कूल आदी शाळांमध्ये संभ्रमाचे वातावरण दिसून आले. सकाळी स्कूल बसच्या तोडफोडीचे मेसेज व फोटो व्हायरलने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. काही शाळांनी मात्र सावध पवित्रा घेत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
>महाविद्यालयांचा
संमिश्र प्रतिसाद
एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची भेट घेऊन महाविद्यालये बंद करण्याची विनंती केली.
त्याला महाविद्यालयांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अथवा संलग्न महाविद्यालयांनी बंदमध्ये सहभाग घेतला नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
>बंदमध्ये युवक सहभागी
बंदमध्ये युवकांनी सक्रिय सहभाग घेतला. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांबरोबर कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँगे्रसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पर्वती विधानसभा मतदारसंघात शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. संबंधित दुकानदार व पेट्रोलपंप चालकांना विनंती केल्याने सिटीप्राईड थिएटर, परिसरातील दुकाने तसेच पेट्रोलपंप बंद ठेवले. संतोष नांगरे, अमोल ननावरे, संजय दामोदरे, करण गायकवाड आदी सहभागी होते.
युवक कॉँग्रेसच्या वतीने डेक्कन येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. अमिर शेख, विकास लांडगे, सोनाली मारणे, भूषण रानभरे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.