दीड वर्षांनी घंटा वाजली! औक्षण आणि फुलांची उधळण करत विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 12:10 PM2021-10-04T12:10:39+5:302021-10-04T12:16:49+5:30
शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची योग्य ती खबरदारी घेण्यात येत असून सरकारी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे
धायरी: राज्यात ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(uddhav thackeray) यांनी हिरवा कंदील दाखविल्याने पुण्यात ८ वी ते १२ वीच्या शाळांचे वर्ग आज सोमवारपासून सुरू करण्यात आले आहेत. पुण्यातील नऱ्हेगावात शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत केले आहे. गेल्या काही दिवसांपासून पालक आणि विद्यार्थ्यांकडून शाळा सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती. याबाबत शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे शाळा सुरु करण्यास परवानगी मागितली होती. अखेर ही मागणी पूर्ण करण्यात आल्याने शाळा सुरू झाल्या आहेत.
शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची योग्य ती खबरदारी घेण्यात येत असून सरकारी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. शाळेमध्ये हेल्थ क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत. शाळेत येताना विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावयाची याबाबतही शाळेत मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या नऱ्हे येथील सिग्नेट पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका अजिता परबत यांनी 'लोकमत ' शी बोलताना सांगितले.
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना, खेळाच्या मैदानाबाबत मार्गदर्शन, आजारी विद्यार्थी शोधणे, विद्यार्थ्यांवरील मनोसामाजिक परिणामांबाबत शिक्षकांना अवगत करणे, विद्यार्थ्यांच्या मनोसामाजिक स्वास्थ्याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन, शिक्षक-पालक बैठकीत चर्चा, घरात प्रवेश करतांना घ्यावयाची काळजी आदींबाबत शाळा प्रशासन योग्य ती काळजी घेताना दिसून येत आहे.