शाळा, महाविद्यालये आता तरी उघडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:14 AM2021-08-27T04:14:14+5:302021-08-27T04:14:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “आता निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. दुकानदार जास्त वेळेची मागणी करत आहेत, काही जण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “आता निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. दुकानदार जास्त वेळेची मागणी करत आहेत, काही जण दहीहंडीची, काहीजण बैल शर्यतीची, काही जण मंदिर उघडण्याची, तर काही जण रेल्वे प्रवासाची मागणी करत आहेत. पण या सर्वांपेक्षा शिक्षण मंदिरे सुरू होणे गरजेचे आहे. दीड वर्षापासून महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था ठप्प झाली आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालये सुरू करावीत,” अशी मागणी मायक्रोबायोलॉजिस्ट ऑफ इंडियातर्फे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून करण्यात आली आहे.
आपले पत्र शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करून योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे. “ऑनलाईन शिक्षणास खूप मर्यादा आहेत. केवळ २४ टक्के लोकांना चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळते. बरीच मुले नावापुरता क्लास सुरू करून गेम खेळत बसतात. या वर्षी परीक्षाही नावापुरत्या घेण्यात आल्या. प्रात्यक्षिक न घेता विज्ञान व तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्यात आले. या पिढीला आत्मविश्वास न मिळाल्याने समाजाचे व देशाचे मोठे नुकसान होत आहे,” याकडे सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख यांनी लक्ष वेधले आहे.
शाळा बंद असल्यामुळे मुलांचे मानसिक आरोग्य बिघडू लागले आहे. अजून दोन वर्षे तरी महामारीची परिस्थिती थोड्याफार फरकाने अशीच राहणार आहे. मग किती दिवस शाळा, महावद्यालये बंद ठेवणार, असा प्रश्नही सोसायटीने उपस्थित केला आहे.
चौकट
शिक्षण अशा प्रकारे सुरू करावे :
१. सुरुवातीला केवळ प्रात्यक्षिकांचे तास सुरू करता येतील.
२. केवळ पन्नास टक्के क्षमतेने तास सुरू करता येतील. तीन दिवस पन्नास टक्के मुलांना बोलावून उरलेले तीन दिवस बाकी निम्म्या मुलांना बोलावता येईल.
३. गरज वाटले तर मैदानात तास भरवता येतील.
४. शाळेमध्ये प्रोटोकॉल पाळणे बंधनकारक असावे.