शाळांचा आता ‘डिजिटल’ संवाद, शिक्षण तज्ज्ञांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 03:10 AM2017-08-11T03:10:02+5:302017-08-11T03:10:26+5:30
माहिती-तंत्रज्ञानाच्या वापरातून शाळा व विद्यार्थी-पालकांमधील सुसंवाद अधिक चांगल्या प्रकारे वाढविण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. डिजिटल संवादाच्या माध्यमातून या घटकांमधील दुरावा कमी होऊन चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी अनेक शाळा पुढाकार घेऊ लागल्या आहेत.
पुणे : माहिती-तंत्रज्ञानाच्या वापरातून शाळा व विद्यार्थी-पालकांमधील सुसंवाद अधिक चांगल्या प्रकारे वाढविण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. डिजिटल संवादाच्या माध्यमातून या घटकांमधील दुरावा कमी होऊन चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी अनेक शाळा पुढाकार घेऊ लागल्या आहेत. यामध्ये अधिकाधिक विद्यार्थी व पालकांचा सहभाग वाढविण्यासाठी शाळा स्तरावर आणखी प्रयत्न होण्याची गरज असल्याचे मत या विषयावरील चर्चेत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
शाळांमध्ये डिजिटल साधनांचा वापर वाढत आहे. त्यामाध्यमातून ई-लर्निंगसह विद्यार्थी-पालकांना विविध सुविधा उपलब्ध होत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ बालविकास मंचाच्या माध्यमातून ‘लोकमत’ कार्यालयामध्ये शहरातील विविध शाळांमधील पदाधिकाºयांमध्ये संवाद घडवून आणण्यात आला. त्यामध्ये विद्या व्हॅली स्कूलचे संचालक विवेक गुप्ता, विद्या महामंडळाचे संचालक अभिजित आपटे, रोझरी गु्रप आॅफ स्कूलचे संस्थापक-अध्यक्ष विनय अºहाना, विद्या व्हॅली स्कूलच्या संस्थापिका नलिनी सेनगुप्ता, जोग एज्युकेशनल ट्रस्टचे उपाध्यक्ष
डॉ. अमोल जोग, अभिनव एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष राजीव जगताप, महाराष्ट्र मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले, ससाणे एज्युकेशन ट्रस्टचे संचालक योगेश ससाणे, वाईज टेक्नॉलॉजीचे संचालक शिशिर गोखले, फीकॉमर्सचे संचालक अनिल शर्मा, होजे थट्टील यांनी सहभाग घेतला. ‘लोकमत’चे महाव्यवस्थापक मिलन दर्डा यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले.
‘डिजिटल इंडिया’ अभियानामध्ये शाळाही डिजिटल करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. तसेच शाळांच्या पातळीवरही त्या अनुषंगाने प्रयत्न केले जात आहेत. व्हॉट्सअॅपसह विविध सोशल मीडिया, नवनवीन अॅपचा वापर वाढला आहे. या माध्यमातून विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहचण्याचा शाळांचा प्रयत्न आहे. शाळांमधील विविध उपक्रम, विद्यार्थ्यांचे निकाल, गृहपाठ, सुट्ट्या, महोत्सव, विविध कार्यक्रमांची माहिती एकाचवेळी सर्व पालकांपर्यंत पोहविण्यासाठी हे व्यासपीठ फायदेशीर ठरत आहे. त्याचे पालकांकडूनही स्वागत केले जात असल्याचे बहुतेकांनी चर्चेदरम्यान सांगितले. डिजिटल संवाद वाढविण्याची गरज असल्याचे मत सर्वांनीच व्यक्त केले. तसेच यापुढील काळात अशा प्रकारे विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल, अशा विश्वासही
त्यांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर व्यक्त केला.
शाळा व्यवस्थापन आणि विद्यार्थी-पालकांमधील अंतर कमी होणे आवश्यक आहे. डिजिटल माध्यमे व अॅपच्या माध्यमातून हे अंतर कमी झाले आहे. पालकांचा दृष्टिकोनही बदलत असून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पालकांचे चांगले सहकार्य मिळू लागले आहे.
- नलिनी सेनगुप्ता,
संस्थापिका, विद्या व्हॅली स्कूल
खूप चांगले प्रयत्न आहेत. शिक्षणामध्ये डिजिटल माध्यमांचा अधिकाधिक वापर होणे, काळाची गरज आहे. हेच भविष्य आहे. पालक, विद्यार्थी व शाळांमधील संवाद डिजिटल होत आहे. सोशल मीडियाचा वापरही वाढत आहे. ई-लर्निंगच्या दृष्टीने तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर वाढायला हवा.
- विनय अºहाना,
संस्थापक-अध्यक्ष, रोझरी ग्रुप आॅफ स्कूल
शाळा, विद्यार्थी व पालकांसाठी ‘अॅप’ हा खूप फायदेशीर आणि चांगला प्रयोग आहे. मागील वर्षी शाळेमध्ये २ ते ५ टक्के पालक मोबाईल वापरत नव्हते. आता बहुतेक पालकांकडे मोबाईल आला आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक पालक व विद्यार्थ्यांना शाळेशी जोडले जाईल.
- अभिजित आपटे,
संचालक, विद्या महामंडळ
शाळा व्यवस्थापन व पालकांमध्ये अधिकाधिक चांगल्या प्रकारे संवाद होण्याच्या दृष्टीने अॅपसह इतर डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर होऊ शकतो. याचा अनुभव मागील वर्षभरात आला आहे. इतर शाळांमध्येही अशा माध्यमांचा वापर वाढणे आवश्यक आहे.
- विवेक गुप्ता,
संचालक, विद्या व्हॅली स्कूल
‘अॅप’सारख्या डिजिटल माध्यमातून पालकही शाळेशी थेट जोडले जातील. शाळेकडून राबविण्यात येणारे विविध उपक्रम, अभ्यासासाठी संबंधित घडामोडी घरबसल्या सहज कळतील. याचा सर्वांना फायदा होईल. त्यामुळे याचा वापर वाढयला हवा.
- धनंजय दामले,
सरचिटणीस, महाराष्ट्र मंडळ
पालकांना शाळेशी संबंधित विविध उपक्रमांची माहिती होण्यासाठी असे अॅप खूपच फायदेशीर ठरतील. ‘अॅप’चे प्रयत्न खूप चांगले आहे. त्यातच हे मोफत उपलब्ध होत असल्याने सर्व शाळांकडून प्रतिसाद मिळेल.
- राजीव जगताप, संस्थापक-अध्यक्ष, अभिनव एज्युकेशन सोसायटी
देशात २०१५ पासून डिजिटल इंडिया हे अभियान सुरू झाले आहे. त्यानुसार प्रत्येक क्षेत्रात डिजिटल युग अवतरणार आहे. त्यामुळे शाळांमध्येही अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. विद्यार्थी, पालक व शाळा व्यवस्थापनामध्ये सातत्यपूर्ण संवादासाही हे खूप महत्त्वाचे आहे.
- डॉ. अमोल जोग, उपाध्यक्ष, जोग एज्युकेशनल ट्रस्ट
सध्या सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर योग्य पद्धतीने होत नाही. अॅप किंवा इतर माध्यमातून शाळा व विद्यार्थी-पालकांमध्ये संवाद घडविणे आवश्यक आहे. ही काळाची गरज बनली आहे. ग्रामीण भागातील शाळांना खर्च परवडत नसल्याने असे उपक्रम मोफत राबवायला हवेत. पालिका शाळांमध्ये याची गरज आहे.
- योगेश ससाणे, संचालक, ससाणे एज्युकेशन ट्रस्टचे न्यु इंग्लिश स्कूल