पुण्यातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:39 AM2020-11-22T09:39:18+5:302020-11-22T09:39:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पालिकेच्या हद्दीतील शाळा शासनाच्या निर्देशानुसार २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार की नाही याबाबतचा संभ्रम दूर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पालिकेच्या हद्दीतील शाळा शासनाच्या निर्देशानुसार २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार की नाही याबाबतचा संभ्रम दूर झाला आहे. पुण्यातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पालकांशी चर्चा करून आणि कोरोना रूग्णांची सद्यःस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे महापौरांनी सांगितले.
राज्य शासनाने राज्यातील नववी ते बारावी दरम्यानच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शाळा सुरू करण्यासाठी शाळांची स्वच्छता, सॅनिटायझेशन सुरू करण्यात आले. पालिकेच्या शिक्षकांनी कोरोना चाचण्या करून घेण्यास सुरुवात केली. पालिकेच्या शाळांमध्ये हात धुण्यासाठी साबण, हँडसॅनिटायजर आणि मास्क इत्यादी सुविधांची तयारी सुरु झाली. पालकांकडून संमतीपत्र भरून घेण्यास सुरुवात करण्यात आली. परंतु, अनेक पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास नकार दर्शविला.
दरम्यान, मुंबई पालिकेने ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळांचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोडला असल्याचे स्पष्ट केले. पुण्यातही मागील चार दिवसात रुग्ण वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
चौकट
शहरातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद राहणार असून त्यानंतर कोरोना स्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय जाहीर करु. पालकांशी चर्चा करुन आणि सद्यस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतला. शहरातल्या महापालिकेच्या आणि खासगी शाळा बंदच राहणार आहेत.
- मुरलीधर मोहोळ, महापौर
----//----
१. पुणे महापालिका हद्दीत सरकारी, खाजगी आणि पालिकेच्या शाळांमध्ये शिकतात. नववी ते बारावी या वर्गात सुमारे सव्वादोन लाख विद्यार्थी आहेत.
२. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने खबरदारी.
३. बहुतांश पालकांनी दिला मुलांना शाळेत पाठविण्यास नकार.
४. कोरोना चाचण्यांमध्ये शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ‘पॉझिटिव्ह’चे प्रमाण अधिक.