पुण्यातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद राहणार; कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
By कुणाल गवाणकर | Published: November 21, 2020 05:17 PM2020-11-21T17:17:53+5:302020-11-21T17:20:02+5:30
कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती असल्यानं महापालिका प्रशासनाचा निर्णय
पुणे: कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्यानं दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुणे महापालिकेनं शहरातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या निर्णयाची माहिती दिली.
मुंबई, ठाणे, पनवेलमधील सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत राहणार बंदच!
कोरोनाचा प्रादुर्भाव वाझू नये यासाठी महापालिका आणि खासगी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. १३ डिसेंबरला कोरोना स्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल आणि त्याआधी पालकांशी चर्चा केली जाईल, असं मोहोळ म्हणाले. पुणे महापालिकेपाठोपाठ पिंपरी-चिंचवड महापालिकादेखील असाच निर्णय घेण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे, पनवेलमधील सर्व शाळा ३१ डिसेंबरपर्यंत राहणार बंदच!
वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईसह ठाणे जिल्हा आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शाळा सध्या सुरू होणार नाहीत, असे आदेश स्थानिक प्रशासनाकडून शुक्रवारी देण्यात आले. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या आदेशानूसार ३१ डिसेंबरपर्यंत मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांची व व्यवस्थापनांची विद्यालये बंद राहणार असल्याच्या सूचना महानगरपालिका शिक्षण विभागाने जारी केल्या. ठाणे जिल्ह्यातील सर्व खासगी, सरकारी आणि महापालिकेच्या शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना शुक्रवारी तसे निर्देश दिले. तर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खासगी, सरकारी आणि महापालिकेच्या शाळा ३१ डिसेंबर पर्यंत बंद राहणार असल्याचे आदेश पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेणार-शिक्षणमंत्री
राज्यात संभ्रम कायम
महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते बारावीचे वर्ग येत्या सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र, शाळा सुरू करताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. शाळांबाबत स्थानिक जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचारविनिमय करून निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. यामुळे सोमवारपासून शाळा नेमक्या सुरु होणार की नाहीत याबाबत राज्यात संभ्रम कायम आहे.
प्रत्यक्ष वर्ग नसले तरी ऑनलाइन शिक्षण सुरूच राहणार
प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले नसले तरी ऑनलाइन शिक्षण सुरूच राहणार आहे. कोरोनाच्या महामारीच्या संकटात विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.