वेल्हेत अंगणवाडीताई चालवताहेत शाळा!
By admin | Published: October 6, 2014 06:41 AM2014-10-06T06:41:14+5:302014-10-06T06:41:14+5:30
जोडून आलेल्या सुट्ट्या व निवडणुकीची कामे यांमुळे वेल्हे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या काही शाळा अंगणवाडीताई चालवत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आले
मार्गासनी : जोडून आलेल्या सुट्ट्या व निवडणुकीची कामे यांमुळे वेल्हे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या काही शाळा अंगणवाडीताई चालवत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. येथील दहा शाळांत शनिवारी
पाहणी केली असता, सहा शाळांत शिक्षक उपस्थित होते. मात्र चार शाळांतील प्रत्येकी एक शिक्षक रजेचा अर्ज ठेवून गायब होता. याची साधी वहीत नोंदही नसल्याचे दिसले. सोंडे कार्ला येथील शाळा अंगणवाडीताई चालवत होत्या.
वेल्हे तालुक्यात शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चालला असून, शिक्षकावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची संख्या १५०च्या आसपास असून, एकूण ३५४ शिक्षक कार्यरत आहेत. ९५ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यात विधानसभा निवडणुकीसाठी ८५ शिक्षक बीएलओचे काम करीत आहेत. वेल्हे तालुका दुर्गम डोंगराळ असून, येथील काही ठिकाणी विद्यार्थी दहा ते बारा किलोमीटरहून पायी चालत शाळेत येतात. मात्र शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
‘लोकमत’ने वेल्हा-चेलाडी रस्त्यावरील दहा शाळांना भेटी
दिल्या. सोंडे कार्ला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दोन
शिक्षक असून, त्यापैकी एका शिक्षकाचा रजेचा अर्ज होता व एक शिक्षिका केंद्रशाळेत मीटिंगसाठी गेल्या होत्या. या ठिकाणी अंगणवाडीताई शाळा चालवत असल्याचे पाहावयास मिळाले. करंजावणे, कातवडी, आडवली या शाळांत प्रत्येकी एक एक शिक्षक रजेचा अर्ज ठेवून गायब झाल्याचे दिसले. कोणत्याही शाळेने याबाबत नोंदवहीत नोंद केली नव्हती.
तालुक्यातील शालेय पोषण आहाराबाबत देखील उदासीनता दिसून येत आहे. मुलांना निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत असून, या अन्नातून विषबाधा होण्याची दाट शक्यता आहे.
तालुक्यात सध्या दिवाळीपूर्व परीक्षेचा कालावधी सुरू असून, ८५ शिक्षक निवडणुकीच्या कामासाठी गेले आहेत तर उर्वरित शिक्षक रजेवर जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. (वार्ताहर)