शाळांसमोरील कोंडी फुटणार

By admin | Published: September 3, 2016 03:20 AM2016-09-03T03:20:43+5:302016-09-03T03:20:43+5:30

शहरातील मध्यवर्ती भागातील आणि उपनगरांमधील वर्दळीच्या ठिकाणच्या शाळांसमोरील वाहतूककोंडीचा प्रश्न सोडण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असून, लवकरच

Schools will be divided | शाळांसमोरील कोंडी फुटणार

शाळांसमोरील कोंडी फुटणार

Next

पुणे : शहरातील मध्यवर्ती भागातील आणि उपनगरांमधील वर्दळीच्या ठिकाणच्या शाळांसमोरील वाहतूककोंडीचा प्रश्न सोडण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असून, लवकरच संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेतली जाणार आहे. तसेच, शिक्षण विभागाचे अधिकारी वाहतूक पोलिसांशी याबाबत संवाद साधून या प्रश्नावर तोडगा काढला जाणार आहे.
शहरातील मध्यवस्तीसह पुणे स्टेशन, कॅम्प, कोथरूड, वारजे, कोंढवा, येरवडा आदी भागांतील काही शाळा रस्त्याला लागून आहेत. परिणामी, शाळा भरण्यापूर्वी काही वेळ आणि शाळा सुटल्यानंतर अर्धा ते पाऊण तास शाळेच्या परिसरात प्रचंड वाहतूककोंडी होते. विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी आलेल्या स्कूल बस, रिक्षा तसेच पालकांच्या चार चाकी व दुचाकी गाड्या रस्त्यावरच लावल्या जातात. शाळांकडे पार्किंगसाठी जागा नसल्याने विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडून शाळेत जावे व यावे लागते. बऱ्याच वेळा रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांचे अपघात होण्याची शक्यता असते. शाळांसमोर दररोज होणाऱ्या वाहतूककोंडीच्या प्रश्नाला ‘लोकमत’ने वाचा फोडली होती. यावर शिक्षण विभागाने संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय घेतला.
शालेय शिक्षण विभागाने २०११मध्ये तयार विद्यार्थी वाहतुकीबाबत नियमावली तयार केली असून त्यानुसार शाळांच्या प्रवेशद्वारासमोर खासगी वाहने, रिक्षा टॅक्सी थांबविण्यास परवानगी देऊ नये, वाहतूक पोलिसांशी चर्चा करून स्थानिक प्राधिकरणाच्या मदतीने शाळेजवळ आवश्यक चिन्हांकने आणि खुणा लावणे आवश्यक आहे. वाहतूक पोलिसांशी चर्चा करून वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पुरेशा संख्येत वाहतूक रक्षकांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. शाळेजवळ बसथांबे निश्चित करणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमावलीचे पालन केले जात नाही. परंतु, शिक्षण विभागाकडून या नियमावलीच्या पालनासाठी सकारात्मक पाऊल उचलले जाणार आहे.

पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर म्हणाले, की शाळांसमोरील विद्यार्थी वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रथमत: वाहतूककोंडी होणाऱ्या शाळांचा शोध घेतला जाईल. एखाद्या परिसरातील अनेक शाळा एकाच वेळी सुटल्यास आणि शाळेतील सर्व विद्यार्थी एकाच वेळी प्रवेशद्वाराबाहेर आल्यास वाहतूककोंडी होते. मात्र, शाळा सुटण्याच्या वेळेत बदल केल्यास आणि सर्व विद्यार्थ्यांना एकाच वेळी शाळेबाहेर न सोडता ५ ते १० मिनिटांच्या अंतराने सोडल्यास हा प्रश्न सुटू शकतो. यावर संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. तसेच, वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनाचेही यासाठी सहकार्य घेतले जाईल.

Web Title: Schools will be divided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.