विज्ञान शाखा ठरतेय वरचढ
By admin | Published: June 21, 2017 06:22 AM2017-06-21T06:22:33+5:302017-06-21T06:22:33+5:30
मागील सहा वर्षांपूर्वी आघाडीवर असलेल्या कला शाखेवर विज्ञान शाखा वरचढ ठरली आहे. शैक्षणिक वर्ष २०१०-११ मध्ये राज्यात सुमारे ४ लाख ५७
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मागील सहा वर्षांपूर्वी आघाडीवर असलेल्या कला शाखेवर विज्ञान शाखा वरचढ ठरली आहे. शैक्षणिक वर्ष २०१०-११ मध्ये राज्यात सुमारे ४ लाख ५७ हजार विद्यार्थ्यांनी कला शाखेतून इयत्ता बारावीची परीक्षा दिली होती. त्या वेळी विज्ञान शाखेचे ३ लाख ६४ हजार विद्यार्थी होते. त्या तुलनेत शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये तब्बल १ लाख ७४ हजाराने वाढ झाली आहे, तर कला शाखेतील वाढ केवळ १८ हजारांवर मर्यादित राहिल्याचे दिसते.
काही वर्षांपासून पारंपरिक अभ्यासक्रमांऐवजी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. विज्ञान शाखेत शिक्षण घेतल्यानंतर मिळणाऱ्या विविध संधी यामुळे अनेक विद्यार्थी व पालक इयत्ता दहावीनंतर प्राधान्याने विज्ञान शाखेतून पुढील शिक्षण घेण्याला प्राधान्य देऊ लागले आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापनशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट, औषधनिर्माणशास्त्र, स्थापत्यशास्त्र अशा विविध अभ्यासक्रमांना पसंती मिळत आहे. त्यामुळे काही वर्षांपासून विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्या तुलनेत कला शाखे मागे पडू लागली आहे. तुलनेने कमी संधी असल्याने कलेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी आहे. कलेच्या तुलनेत वाणिज्य शाखेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण चांगले आहे.
शैक्षणिक वर्ष २०१०-११ मध्ये राज्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावीची परीक्षा दिलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ५७ हजार ५८ विद्यार्थी कला शाखेतील होते, तर विज्ञान शाखेतून सुमारे ३ लाख ६४ हजार आणि वाणिज्य शाखेतून २ लाख ८३ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यावर्षी विज्ञानच्या तुलनेत कलेतील विद्यार्थ्यांची संख्या तब्बल लाखभराने अधिक दिसून येते. त्यानंतर प्रत्येक वर्षी हे अंतर झपाट्याने कमी होत गेल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. परीक्षा देणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या ज्या तुलनेत वाढत गेली त्या तुलनेत कला शाखेकडील कल कमी होत गेला आहे. शैक्षणिक वर्ष २०१३-१४ मध्ये विज्ञानाने कला शाखेला मागे टाकून आघाडी घेण्यास सुरुवात केली. ही आघाडी वेगाने वाढत असून कला शाखा खूप मागे पडली आहे.