समाजकल्याणच्या शाळांमध्ये विज्ञान केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:14 AM2021-08-20T04:14:21+5:302021-08-20T04:14:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अनुसूचित नवबौद्ध विद्यार्थ्यांच्या शालेय गुणवत्तेत वाढ होण्यासाठी जिल्हा समाजकल्याण विभागाने त्यांच्या शाळांमध्ये विज्ञान केंद्र ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अनुसूचित नवबौद्ध विद्यार्थ्यांच्या शालेय गुणवत्तेत वाढ होण्यासाठी जिल्हा समाजकल्याण विभागाने त्यांच्या शाळांमध्ये विज्ञान केंद्र सुरू केले आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या प्रयत्नांमधून हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. सरकारकडून समाजकल्याण विभागाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात अनुसूचित नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा चालवल्या जातात. जिल्ह्यात तरंगवाडी (इंदापूर), दिवे (पुरंदर), चांडोली (खेड) व आंबेगाव (पेठ) या ४ ठिकाणी इयत्ता ६ वी १० वीच्या ४ शाळा आहेत. प्रत्येकी २०० याप्रमाणे ८०० विद्यार्थी तिथे शिक्षण घेतात. या शाळांमध्ये प्रयोगशाळेची उणीव होती. एका खासगी संस्थेची मदत घेऊन या चारही शाळांमध्ये विज्ञान केंद्र सुरू करण्यात आले आहे.
येथे खगोलशास्त्रासह सर्व शास्त्रांमधील पायाभूत संकल्पना विद्यार्थ्यांना समजतील अशी विविध उपकरणे, पुस्तके, चित्रे तसेच प्रशिक्षित शिक्षकही आहेत. विद्यार्थ्यांना प्रयोग करून पाहण्याची, उपकरणे हाताळण्याची मुभा आहे. शहरी शाळांप्रमाणेच सुविधा येथील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. समाजकल्याण जिल्हा सहआयुक्त संगिता डावखरे यांनी सांगितले की, या योजनेतंर्गत राज्यातल्या कोणत्याच शाळेत असे विज्ञान केंद्र नाही. सामान्य स्थिती असलेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्याचा उद्देश यामागे आहे.