विज्ञान संवादाचा दुवा
By sanglihyperlocal | Published: January 31, 2021 08:27 AM2021-01-31T08:27:36+5:302021-01-31T08:27:44+5:30
विज्ञान हा क्लिष्ट विषय आहे आणि विज्ञान साहित्य रूक्ष असते अशी भावना जनसामान्यांत असते. मराठी वाचकांच्या बाबतीत तरी हा गैरसमज दूर करण्यात विज्ञाननिष्ठ लेखक डाॅ. जयंत नारळीकर हे मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले आहेत.
साहित्याच्या क्षेत्रात ललित साहित्य लोकप्रिय असले तरी वैज्ञानिक विषयांवरील ललित लेखनाची गणती मात्र ‘दुय्यम’ प्रकारच्या साहित्यात केली जात होती. वैज्ञानिक संकल्पनांचा आधार घेऊन मराठीत विज्ञान साहित्य लिहिणाऱ्या लेखकांनी हा समज मोडून काढत विज्ञान साहित्याची एक वेगळी वाट चोखाळली. अशा विज्ञान साहित्यिकांत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर यांचे स्थान अग्रभागी आहे.
विज्ञानलेखक म्हणून नारळीकर यांची लेखनयात्रा १९६३ मध्ये सुरू झाली. त्यांचे पहिले विज्ञान लेखन ‘डिस्कव्हरी’ या इंग्रजी मासिकासाठी झाले. असे लेखन त्यांनी पूर्वी केले नव्हते तरीही त्यांचा हा लेखनप्रयोग यशस्वी झाला. त्यानंतर इंग्लंडमधील ‘न्यू सायंटिस्ट’मध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले. भारतातील ‘सायन्स टुडे’ने त्यांना अशा लेखनासाठी प्रोत्साहन दिले. वाचकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादावरून त्यांना जाणवले की वाचकांना विज्ञान-तंत्रज्ञान याबद्दल जिज्ञासा असली तरी वैज्ञानिक विषय मात्र क्लिष्ट आणि दुर्बोध वाटतात. विज्ञानप्रसाराच्या उद्देशाने नारळीकर यांनी आपल्या लेखनात त्यांचे मार्गदर्शक आणि गुरू फ्रेड हॉएल यांच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी इंग्रजी, मराठी आणि हिंदी या तीन भाषांतून विज्ञानप्रसाराचे लेखन केले. लेखांपासून सुरू झालेली ही लेखनयात्रा १९७७ मध्ये पुस्तकांपर्यंत पोहोचली. नेहरू फेलोशिपसाठी निवडलेल्या प्रकल्पातून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केलेल्या ‘The Structure of the Universe’ या पुस्तकाला जागतिक स्तरावर उत्तम प्रतिसाद मिळाला. यानंतर ऑक्सफर्ड, केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस, फ्रीमन अशा दर्जेदार प्रकाशकांनी त्यांची आणखी काही पुस्तके प्रकाशित केली.
नारळीकर १९७२ साली भारतात परतल्यावर मुंबईत स्थायिक झाले तेव्हा त्यांना मराठीत विज्ञानकथा लिहिण्यासाठी प्रवृत्त करणारी एक घटना घडली. १९७४ मध्ये मराठी विज्ञान परिषदेने आयोजित केलेल्या विज्ञान लघुकथांच्या स्पर्धेची जाहिरात पाहून त्यांना एक विज्ञान कथा लिहावीशी वाटली. ते अहमदाबादला परिसंवादासाठी गेले होते तेव्हा वक्त्याचे व्याख्यान कंटाळवाणे असल्याने मनात घोळत असलेली गोष्ट लिहायला सुरुवात केली. या कथेला ‘कृष्णविवर’ शीर्षक देऊन त्यांनी ती कथा वेगळ्या नावाने पत्नीच्या हस्ताक्षरात लिहून पाठविली. स्पर्धेत पहिला क्रमांक मिळाल्याचे पत्र आणि पुरस्कारासाठी येण्याचे आमंत्रण आले. त्यामुळे नारळीकर यांना आनंद झाला खरा, पण या कथेचा खरा लेखक तेच होते हे उघड करावे लागले.
ही कथा पुढे दुर्गाबाई भागवत यांच्या नजरेस पडली. दुर्गाबाई त्या वेळी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा होत्या. आपल्या भाषणात त्यांनी या कथेचे कौतुक केले आणि विज्ञानकथेच्या माध्यमाने नारळीकर यांनी मराठी साहित्यात नवे दालन उघडले, अशी प्रशंसा केली.
पुढे मुकुंदराव किर्लोस्करांनी ‘किर्लोस्कर’ या मासिकात विज्ञानकथा लिहिण्यास त्यांना उद्युक्त केल्यामुळे त्यांच्या विज्ञानकथा प्रसिद्ध होऊ लागल्या. त्यांतील पहिली ‘उजव्या सोंडेचा गणपती.’ त्यानंतर ‘महाराष्ट्र टाइम्स’ सारख्या दिवाळी अंकांतही त्यांच्या विज्ञानकथा येऊ लागल्या. ‘यक्षांची देणगी’ हा पहिला विज्ञानकथा संग्रह ‘मौज प्रकाशना’ने प्रसिद्ध केला. त्यानंतर ‘अंतराळातील भस्मासुर’, ‘टाइम मशीनची किमया’ आणि ‘सूर्याचा प्रकोप’ हे कथासंग्रह ‘श्रीविद्या प्रकाशना’तर्फे तसेच ‘प्रेषित’, ‘वामन परत न आला’, ‘अंतराळातील स्फोट’ आणि ‘अभयारण्य’ या चार कादंबऱ्या ‘मौज’तर्फे प्रसिद्ध झाल्या. नारळीकर यांनी मुलांसाठी लिहिलेल्या ‘अंतराळातील स्फोट’ या कादंबरीचे प्रकाशन साहित्य अकादमीने मराठीत आणि भारतीय भाषांतून प्रकाशित केले. डॉ. नारळीकर यांनी त्यांच्या पत्नी मंगला नारळीकर ह्यांच्यासह ‘नभात हसते तारे’ हे पुस्तक संयुक्तरीत्या लिहिले. ललित विज्ञानातील पुस्तकांपैकी ‘आकाशाशी जडले नाते’ हे आणि विज्ञानकथात्मक साहित्यात ‘वामन परत न आला’ ही कादंबरी ही त्यांची गाजलेली पुस्तके मानली जातात. अर्थात ही दोन्ही पुस्तके लिहिताना त्यांना खूप परिश्रम करावे लागले; पण वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
नारळीकर यांच्या दीर्घ अनुभवावर आधारित ‘मी शास्त्रज्ञ कसा झालो?’ हे पुस्तक वाचनीय आहे. त्यांनी संपादित केलेली ‘सृष्टीविज्ञान गाथा’ ही ‘आरोग्य’, ‘वैद्यक’, ‘भौतिक शास्त्र’, ‘खगोल’, ‘भूगोल’, ‘इंजिनीअरिंग आणि कॉम्प्युटर, ‘प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र’, ‘सामाजिक’ आणि इतर विषयांना वाहिलेली माहितीपूर्ण ग्रंथमाला आहे. त्यांच्या इतर पुस्तकांमध्ये ‘विज्ञानाची गरुड झेप’, ‘विज्ञान आणि वैज्ञानिक’, ‘गणित आणि विज्ञान’, ‘अंतराळ आणि विज्ञान’, ‘विज्ञानविश्वातील वेचक आणि वेधक’, ‘याला जीवन ऐसे नाव’, ‘चला जाऊ अवकाश सफरीला’ (मुलांसाठी) या रंजक व माहितीपर पुस्तकांचा समावेश आहे. ‘चार नगरातले माझे विश्व’ या पुस्तकात त्यांनी बनारस, केंब्रिज, मुंबई आणि पुणे येथील त्यांच्या वास्तव्याचे अनुभव मांडले आहेत. अशा तऱ्हेने नारळीकर यांनी आयुष्यभरात व्रतस्थपणे केलेल्या समृद्ध विज्ञानलेखनाचा हा व्यापक प्रवास थक्क करणारा आहे.
मराठीतून विज्ञान लेखन करताना नारळीकरांना वैज्ञानिक शब्दांची समस्या भेडसावत होती. परंतु लेखनाच्या ओघात त्यांना परिभाषिक शब्द सुचत गेले. काही वेळा त्यांनी शासकीय इंग्रजी-मराठी वैज्ञानिक शब्दकोष वापरला. कधी कधी काही मराठी शब्द अगदीच दुर्बोध वाटले तर त्या ठिकाणी ‘रेडिओ’, ‘टेलिफोन’, ‘हायड्रोजन’, ‘ऑक्सिजन’ असे मूळ इंग्रजी शब्दच वापरणे त्यांना योग्य वाटले. नवनव्या वैज्ञानिक शोधांची मनोवेधक माहिती सामान्य माणसांना देणे हा त्यांच्या विज्ञान लेखनाचा उद्देश होता. विज्ञान म्हणजे काय हे सांगणे, त्याचबरोबर ते कसे वापरावे याबाबत समाजात जागृती करणे यासाठी त्यांनी विज्ञान आणि समाज यांच्यातील दुवा होऊन सातत्याने लेखन केले. विज्ञान हा क्लिष्ट विषय आहे आणि विज्ञान साहित्य रुक्ष असते अशी भावना जनसामान्यांत असते. मराठी वाचकांच्या बाबतीत तरी हा गैरसमज दूर करण्यात विज्ञाननिष्ठ लेखक जयंत नारळीकर हे मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले आहेत. एवढे अथक विज्ञानलेखन करूनही नारळीकर यांनी अशी खंत व्यक्त केली होती की मराठी साहित्याच्या क्षेत्रात विज्ञान लेखन आणि साहित्य यांना जसे हवे तसे स्थान अजूनही मिळालेले नाही. विज्ञानाच्या क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ देऊन अगोदरच सन्मानित केले आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. जयंत नारळीकर यांना मिळाल्याने त्यांच्यातील मराठी साहित्यिकाचा आणि विज्ञान साहित्याचा योग्य तो गौरव झाला आहे.
खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. जयंत नारळीकर हे सुप्रसिद्ध लेखक म्हणूनही ख्यातनाम आहेत. त्यांनी भौतिकशास्त्र आणि खगोलविज्ञानात अनेक पुस्तके तसेच मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषेत विज्ञानकथा आणि कादंबऱ्या लिहिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नारळीकर यांची 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही घटना मराठी साहित्यक्षेत्रासाठी तर विशेष आहेच; परंतु मराठी विज्ञानलेखक आणि विज्ञानसाहित्याचे रसिक यांच्यासाठी खूपच आनंदाची बाब आहे. जयंत नारळीकर यांच्या निवडीमुळे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान वैज्ञानिक साहित्यिकाला पहिल्यांदाच मिळत आहे.