बुद्धिमत्ता असल्यास शास्त्रज्ञ होता येईल : अधिकराव जाधव; पिंपरीत विज्ञान प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 01:29 PM2018-02-12T13:29:05+5:302018-02-12T13:34:45+5:30
विज्ञान प्रदर्शनाद्वारे विद्यार्थांच्या संकल्पना बाहेर येतात व त्यातून उद्याचे शास्त्रज्ञ निर्माण होतात, असे उद्गार सेरिकल्चरिस्ट व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील प्राणिशास्त्र विभागातील प्रा. डॉ. अधिकराव जाधव यांनी काढले.
पिंपरी : मोठे शास्त्रज्ञ होण्यासाठी युरोप-अमेरिकेतच जावे लागते असे नाही़ तुमच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे़ फक्त सातत्याने कष्ट केल्यास तुम्ही येथेही शास्त्रज्ञ होऊ शकता. विज्ञान प्रदर्शनाद्वारे विद्यार्थांच्या संकल्पना बाहेर येतात व त्यातून उद्याचे शास्त्रज्ञ निर्माण होतात, असे उद्गार सेरिकल्चरिस्ट व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील प्राणिशास्त्र विभागातील प्रा. डॉ. अधिकराव जाधव यांनी काढले. ते येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या विज्ञान मंडळाने आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
आपल्या भाषणात ते म्हणाले, रेशिम उद्योगात प्रचंड आर्थिक फायदा आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी रेशीम उद्योगाचा अभ्यास करावा व त्यात करिअर करावे. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी तुतीची लागवड, जगभरातील रेशीम उद्योगाची स्थिती व रेशीम उद्योगाचे इतर अनेक फायदे याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अशोक भोईटे म्हणाले, ‘‘विज्ञान प्रदर्शन ही एक विद्यार्थांसाठी संधी असते़ जो तिचा फायदा घेतो तो पुढे मोठा शास्त्रज्ञ होऊ शकतो.’’
विज्ञान प्रदर्शनात महाविद्यालयातील व नवमहाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थांनी शंभराहून अधिक प्रकल्प सादर केले व परिसरातील विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती.