स्मार्ट सिटी कंपनी पुण्यातील बाणेरमध्ये उभारणार ‘सायन्स पार्क’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 04:10 PM2018-01-04T16:10:26+5:302018-01-04T16:13:11+5:30
स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने स्थळ निर्मिती (प्लेस मेकिंग) उपक्रमांतर्गत बाणेर येथे आकर्षक ‘सायन्स पार्क’ उभारण्यात येणार आहे. या सायन्स पार्कच्या आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
पुणे : स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने स्थळ निर्मिती (प्लेस मेकिंग) उपक्रमांतर्गत बाणेर येथे आकर्षक ‘सायन्स पार्क’ उभारण्यात येणार आहे. या सायन्स पार्कच्या आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. यामध्ये प्रामुख्याने सूर्यमालेची अॅफी थिएटरद्वारे माहिती, पिन होल कॅमेरा, वैज्ञानिक खेळणी, उपकरणे, जाकतिक घड्याळ, दूरदर्शक दुर्बीण, छाया घड्याळ (सनडायल), मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र जागा आदी गोष्टी या सायन्स पार्कची वैशिष्टे असणार आहेत.
शहराच्या विविध भागात महापालिकेच्या मालकीच्या रिकाम्या जागा, भूखंड वापराविना पडून आहेत. तर अनेक ठिकाणी अतिक्रमण देखील झाली आहेत. या रिकाम्या जागांचा उपयोग करण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने प्लेस मेकिंग ही संकल्पना समोर आणली आहे. यात औंध-बाणेर-बालेवाडी स्थानिक क्षेत्र विकास प्रकल्पांतर्गत बाणेर येथे हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. ‘खेळालाच अभ्यास बनवले तर?’ हा या सायन्स पार्कचा मुख्य उद्देश आहे. अभ्यास करताना मुलांना कठीण वाटणारी वैज्ञानिक तत्वे, संकल्पना, नियम उरकरणांच्या आधारे मुलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न असणार आहे.
याबाबत स्मार्ट सिटीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथील सर्व्हे क्रमांक २३ मधील ९८२.८ चौरस मीटर क्षेत्रावर हे सायन्स पार्क उभारण्यात येणार आहे. यात बाल, शिशू, प्राथमिक, उच्च प्राथमिक अशा विविध गटातील मुलांना खेळांच्या माध्यमातून विज्ञान शिकवण्यासाठी विविध शास्त्रीय रचना निर्माण करण्यात येणार आहेत. त्याशिवाय मुलांना खेळण्यासाठी सी-सॉ, झोके, घसरगुंडी अशा खेळांच्या जागाही उभारण्यात येणार आहेत. या प्लेस मेकिंगमध्ये छोटेखानी कॉफी शॉप, तसेच मुलांना शास्त्रीय खेळणी, वस्तू व उपकरणांची खरेदी करण्यासाठी दुकानेही असणार आहेत. बैठकीच्या आकर्षक व्यवस्था (परगोला), चालण्यासाठी, व्यायामासाठी जागा, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्याच्या जागा तयार करण्यात येणार आहेत.