सोशल मीडियावरील निधी संकलनातून लडाख मध्ये उभ राहातयं ' सायन्स पार्क '
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 07:00 AM2019-06-12T07:00:00+5:302019-06-12T07:00:08+5:30
येत्या २० जून रोजी पुण्यात शिकायला आलेल्या लडाखच्या मुलींच्या हस्तेच पार्कचे उदघाटन होणार आहे.
पुणे : सोशल मीडिया फक्त द्वेष पसरविण्याचे दुधारी अस्त्र आहे. त्याचा फक्त ट्रोलिंगसाठीच वापर केला जातो. हा समज पुणेकरांनी काहीप्रमाणात खोटा ठरवला आहे. सोशल मीडियावरील नेटिझन्सच्या मदतीतून एखादे स्वप्न साकार होऊ शकते याचे सकारात्मक उदाहरण समोर आले आहे. असीम फौंडेशनने सोशल मीडियाच्या माध्यमातून संकलित केलेल्या निधीद्वारे लडाख मध्ये मुलांसाठी ‘सायन्स पार्क’ उभारले आहे.
गेली सतरा वर्षे भारताच्या सीमावर्ती भागात कार्य करणा-या असीम फाउंडेशनने हे विधायक पाऊल उचलले आहे. येत्या २० जून रोजी पुण्यात शिकायला आलेल्या लडाखच्या मुलींच्या हस्तेच पार्कचे उदघाटन होणार आहे. भारतीय सैन्याच्या १४ कोअर चे प्रमुख या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी असणार आहेत.
लडाख भौगोलिकदृष्ट्या दुर्गम आणि प्रतिकूल हवामानाचा भाग उर्वरित भारतापासून जवळपास सहा महिने तुटलेला असतो. येथील लोकसंख्येची घनताही कमी. क्षेत्रफळाने मोठा असूनही विकासाची कमतरता जाणवते. असीम फाउंडेशनने २०१२ मध्ये प्रथम लडाख येथे कामाला सुरुवात केली. शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय संधींची ओळख करून देणारा अभिलाषा प्रकल्प त्याठिकाणी राबविला आणि यातूनच लडाख च्या भागामधील शाळांशी संपर्क वाढला. या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी संपर्क आणि मैत्री दौ-यांचे आयोजनही करण्यात आले. पुण्यात सध्या लडाखमधील ८ विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. परंतु विद्यार्थ्यांना कोशात अडकवून न ठेवता त्यांच्या समोर शिक्षणातील प्राथमिक आणि चिरकाळ टिकणा-या मूल्यांची रुजवणूक आणि संवर्धन केले पाहिजे या जाणिवेतून काम वाढत गेले. ‘‘विज्ञानाधारित दृष्टिकोन, तार्किक मीमांसा आणि जिज्ञासा या तीन मूल्यांना एका सूत्रात बांधण्यासाठी म्हणून लडाख येथे ‘सायन्स पार्क’ची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. लडाखची ओळख सहलीची उत्तम जागा आणि निसर्गसौंदर्याने नटलेले ठिकाण एवढीच मर्यादित न राहता या भागाला एक नवी ओळख मिळावी यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला,’’ अशी माहिती असीम फौंडेशनशचे संस्थापक-अध्यक्ष सारंग गोसावी यांनी ‘लोकमत’ला दिली.
---------------------------------------------------------
असे झाले स्वप्न पूर्ण...
या पार्क उभारणीसाठी दोनशे रूपये द्यावेत असे आवाहन सोशल मीडियावर करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातून दीड ते दोन लाख निधी संकलित झाला. फौंडेशनचे सगळे स्वयंसेवक नोकरी करतात. त्यांनी आपल्या पगारातून काही निधी दिला. इथे लडाखमधून शिकायला आलेल्या मुलीच्या पालकांनी अर्धा एकर जागा दिली. या पार्कच्या उभारणीसाठी स्थानिक लोकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. आमचे पार्कचे स्वप्न पूर्ण होत आहे याचा आनंद असल्याचे सारंग गोसावी यांनी सांगितले.