वैज्ञानिक दृष्टीकोनाचा देशात आजही अभाव
By admin | Published: November 11, 2015 01:45 AM2015-11-11T01:45:43+5:302015-11-11T01:45:43+5:30
भारतातील संशोधनाची स्थिती दयनीय आहे. परदेशातून आलेल्या तंत्रज्ञानावर देश अवलंबून आहे. राष्ट्रीय प्रयोगशाळांचे काम निराशाजनक आहे.
पुणे : भारतातील संशोधनाची स्थिती दयनीय आहे. परदेशातून आलेल्या तंत्रज्ञानावर देश अवलंबून आहे. राष्ट्रीय प्रयोगशाळांचे काम निराशाजनक आहे. जग खूप प्रगत झालेले असताना आपल्याकडे आजही वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव असून त्याबाबत अशिक्षितता पहायला मिळते, अशी खंत ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि विचारवंत दत्तप्रसाद दाभोळकर यांनी व्यक्त केली.
अच्युत गोेडबोले आणि दीपा देशमुख लिखित ‘जग बदलणारे १२ जिनियस’ या पुस्तिकांच्या संचाचे प्रकाशन दाभोळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात लेखक आणि चित्रकार अनिल अवचट उपस्थित होते. या प्रसंगी ‘मनोविकास’ प्रकाशनचे अरंविद पाटकरही उपस्थित होते. दाभोळकर म्हणाले, देश विज्ञानयुगात नेण्याचे विवेकानंदांचे स्वप्न होते. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सध्याच्या सैरभैर झालेल्या पिढीला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.
ते म्हणाले, आपल्याकडे मुर्तीला भातुकलीचे स्वरूप दिले जाते. असे करुन आपण देवाला छोटे करत आहोत. आपल्या आजूबाजूला विज्ञानाची अनेक साधने उपलब्ध असताना ती वापरण्याची प्रगल्भता आपल्याकडे नाही. हे चित्र बदलण्याच्या दृष्टीने विज्ञानाचा दृष्टीकोन अधिकाधिक व्यापक व्हायला हवा. विज्ञान हे वरदान आहे. त्यातील मूलनिरपेक्षता, कोरडेपणा नष्ट होऊन निरिक्षण पध्दती विकसित केल्यास विज्ञानाची गोडी निर्माण होईल. (प्रतिनिधी)