कला-साहित्यातून उलगडणार वैज्ञानिक सारस्वत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 02:09 PM2018-07-18T14:09:48+5:302018-07-18T14:17:36+5:30
स्वत:च्या अलौकिक कर्तृत्वाने विश्वाच्या नभांगणावर तळपणारे तेजस्वी व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. जयंत नारळीकर यांनी आजवर १९ भाषांमध्ये १३० हून अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे.
पुणे : विज्ञाननिष्ठा हे मूल्य भारतात रूजवण्याचा सातत्याने प्रयत्न करणारे विज्ञान-प्रसारक आणि अभिमानाने मराठीत लेखन करणारे ज्येष्ठ वैज्ञानिक-लेखक म्हणजे डॉ. जयंत नारळीकर! त्यांच्या साहित्यातून निपजणारा ज्ञानाचा झरा कधीही न आटणारा आहे. संशोधन, अध्यापनाबरोबरच विज्ञानाचा प्रसार, समाजाचा वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करणा-या या वैज्ञानिक सारस्वताचा जीवनपट माहितीपट आणि ग्रंथसंपदेच्या रुपातून नव्याने उलगडणार आहे. दिग्दर्शक अनिल झणकर साहित्य अकादमीसाठी नारळीकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित माहितीपटाची निर्मिती करत आहेत. दुसरीकडे, राजहंस प्रकाशनाच्या वतीने नारळीकर यांच्या ग्रंथसंपदेच्या संकलनाला वेग आला आहे. १९ जुलैला नारळीकरांचा वाढदिवस साजरा होत असून, त्यानिमित्त ही ‘कला-साहित्य’ भेट वाचकांसाठी उपलब्ध होणार आहे.
स्वत:च्या अलौकिक कर्तृत्वाने विश्वाच्या नभांगणावर तळपणारे तेजस्वी असे तारांकित व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. जयंत नारळीकर यांनी आजवर १९ भाषांमध्ये १३० हून अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे. सुसंस्कृतता व बुद्धिमत्तेचे मूर्तीमंत प्रतीक असलेल्या डॉ. जयंत नारळीकर यांनी खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, विश्वाची उत्पत्ती या विषयांवर सखोल अभ्यास आणि संशोधन केले. आयुकाच्या माध्यमातून संशोधन व विज्ञान प्रसाराचे त्यांचे कार्य अविरतपणे चालू आहे. त्यांची ही देदीप्यमान वाटचाल ६० मिनिटांच्या माहितीपटातून जाणून घेता येणार आहे. साहित्य अकादमीकडून याबाबत आॅक्टोबरमध्ये विचारणा करण्यात आली होती. याबाबत नारळीकर यांच्या साहित्याचे संशोधन करुन मुलभूत संहिता पाठवण्यात आली. तज्ज्ञांकडून संहिता मंजूर करण्यात आल्यानंतर मार्च महिन्यात चित्रिकरणाला सुरुवात करण्यात आली. माहितीपटाच्या चित्रिकरणाचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून, यामध्ये मान्यवरांच्या मुलाखती, वाचकांचे चर्चासत्र असे स्वरुप असल्याची माहिती अनिल झणकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. आॅगस्ट महिन्याखेरीस माहितीपटाचे काम पूर्णत्वाला जाण्याची शक्यता असून ‘वैज्ञानिक सारस्वत’ असे नाव निश्चित करण्यात आले आहे.
डॉ. जयंत नारळीकर प्रसिध्द शास्त्रज्ञ आहेतच; ते अत्यंत प्रभावी लेखकही आहेत. आकाशाशी जडले नाते, विमानाची गरुडझेप, गणितातील गमतीजमती, विश्वाची रचना, विज्ञानाचे रचयिते, नभात हसते तारे अशी त्यांची अनेक पुस्तके आणि कथासंग्रह आजही वाचकांच्या पसंतीस उतरतात. राजहंस प्रकाशनातर्फे सुरुवातीच्या टप्प्यात नारळीकर यांनी लिहिलेल्या कादंब-यांचे संकलन खंडाच्या स्वरुपात करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस हा खंड पूर्णत्वाला जाणार असल्याचे दिलीप माजगावकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. पुढील टप्प्यामध्ये नारळीकर यांच्या कथासंग्रहांचे संकलन केले जाणार आहे.
...................
डॉ. जयंत नारळीकर यांची ग्रंथसंपदा विपूल आहे. त्यांच्या कादंब-या एकत्रित स्वरुपात वाचकांना उपलब्ध व्हाव्यात, यादृष्टीने संकलनाचे काम हाती घेण्यात आले आहे. वाचकांचा प्रतिसाद पाहून पुढील वर्षी कथासंग्रहांचे संकलन करुन खंड प्रकाशित केला जाणार आहे.
- दिलीप माजगावकर
-----------------
डॉ. जयंत नारळीकर यांचे लिखाण बहुआयामी आहे. प्रत्यक्ष संशोधन करताना त्यांच्या कामाची व्याप्ती नव्याने जाणून घेता आली. त्यांचे विज्ञानातील योगदान, आयुकाची स्थापना, लेखन अशा विविध टप्प्यांचा आढावा माहितीपटातून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
- अनिल झणकर