संशोधन योजनांच्या निधीला कात्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:09 AM2021-03-28T04:09:50+5:302021-03-28T04:09:50+5:30
पुणे : विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांच्या निधीली ...
पुणे : विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांच्या निधीली कात्री लावल्याची माहिती समोर आली आहे. विद्यापीठाच्या उत्पन्नात घट झाल्याने ॲस्पायर, आविष्कारसारख्या योजनांचा निधी कमी करण्यात आला आहे. सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये संशोधनाला प्राधान्य दिले जात असताना पुणे विद्यापीठाने संशोधनासाठी दिल्या जाणाऱ्या निधीत तब्बल २ कोटी २० लाखांची कपात केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या ठेवी गेल्या कुठे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
अध्यापनाबरोबरच संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळेच पुणे विद्यापीठाने देशातील विद्यापीठांच्या क्रमवारीत चांगले स्थान मिळवले आहे. तसेच विद्यापीठातील विभागांसह संलग्न महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या संशोधनाची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. त्याचप्रमाणे पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आविष्कार स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवला आहे. आाविष्कार स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सादरीकरणाबरोबरच अनेक गोष्टी शिकायला मिळतात. संशोधनाच्या दृष्टीने ॲस्पायर योजनासुध्दा महत्वाची आहे. मात्र, २०२१-२२ या अर्थसंकल्पात संशोधना योजनांच्या रकमेत गेल्या वर्षाच्या तुलनेत २ कोटी २० लाख रुपयांची कपात केली आहे. यंदा ॲस्पायरसाठी ५ कोटी, आविष्कारसाठी ३० लाख, शैक्षणिक संशोधन समन्वय योजनेसाठी १५ लाख रुपये उपलब्ध करून दिले आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केले जातात आहे.
दरम्यान, विद्यापीठाच्या विविध संशोधन योजनांसाठीचा निधी कमी करण्यात आला असला तरी त्याचा परिणाम संशोधनावर होणार नाही, असा दावा विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
----------------
संशोधन योजनांसाठी दिलेला निधी
योजना २०२०-२१ २०२१-२२
ॲस्पायर ७ कोटी ५ कोटी
आविष्कार ४५ लाख ३० लाख
शैक्षणिक संशोधन समन्वय योजना २० लाख १५ लाख
-------------