बिबट्याचा धुमाकूळ; पळसपट्टीचे ग्रामस्थ दहशतीत
By admin | Published: August 30, 2015 02:59 AM2015-08-30T02:59:53+5:302015-08-30T02:59:53+5:30
पळसपट्टी या भागातील नाना टुले यांच्या घराशेजारील गोठ्यात घुसून बिबट्याने रात्रीच्या वेळी शेळीवर हल्ला केला. परंतु शेळीच्या ओरडण्याने सावध झालेल्या शेतकऱ्यांनी
राजणगाव सांडस : पळसपट्टी या भागातील नाना टुले यांच्या घराशेजारील गोठ्यात घुसून बिबट्याने रात्रीच्या वेळी शेळीवर हल्ला केला. परंतु शेळीच्या ओरडण्याने सावध झालेल्या शेतकऱ्यांनी फटाक्यांच्या आवाजाने बिबट्याला पळवून लावले. मात्र बिबट्याच्या या हल्ल्याने निर्माण झालेल्या दहशतीने ग्रामस्थ मात्र धास्तावले आहेत.
पळसपट्टी भागात बिबट्या फिरत असल्याने या भागातील शेतकरी महिला शेतातील कामे करण्यास मजुरीवर जायलाही घाबरत आहेत. या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढलेला असून, वारंवार वनविभागास कळवूनदेखील या भागात बिबट्यास पकडण्यासाठी कोणतीही कारवाई वनविभागाकडून होत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरेही लावलेले नाहीत. त्यामुळे धास्तावलेले नागरिक या सुस्त कारवाईवर संतप्त झालेले आहेत. रात्रीच्या वेळी आलेल्या बिबट्याने गोठ्यातून पाळीव शेळीला ओढून नेले. परंतु शेळीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून लोक जागे झाले. बिबट्याने शेळीला उसाच्या शेतात ओढत नेले. आसपासच्या शेतकऱ्यांनी बॅटरीचा उजेड टाकला तेव्हा बिबट्याने उसाच्या शेतात धूम ठोकली. या भागातील शेतकऱ्यांनी फटाके वाजवून बिबट्यास पळवून लावले.