कांदळी फाट्यावरील पेट्रोल पंप सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 05:09 AM2017-07-20T05:09:33+5:302017-07-20T05:09:33+5:30
पेट्रोल पंपाच्या नोझल पल्सर किटमध्ये फेरफार करून ग्राहकांना कमी पेट्रोल देणारे कांदळी फाटा (ता. जुन्नर) येथील देव पेट्रोलियम या भारत पेट्रोलियम कंपनीच्या
- लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पेट्रोल पंपाच्या नोझल पल्सर किटमध्ये फेरफार करून ग्राहकांना कमी पेट्रोल देणारे कांदळी फाटा (ता. जुन्नर) येथील देव पेट्रोलियम या भारत पेट्रोलियम कंपनीच्या पंपावर ठाणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई करून पेट्रोल पंप सिल केला.
हा पंप पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व शिवसेनेच्या एका नेत्याचा आहे़ नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल पंपाच्या नोझलमध्ये फेरफार करणारी टोळीतील विवेक हरिश्चंद्र शेटे (रा. नं. ए-६, चंद्रेश व्हिला को. आॅप. हौ. सोसायटी, लोढा हेवन, निळजे
ता. कल्याण, जि. ठाणे) यास उत्तर प्रदेश येथील पारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा होऊन अटक करण्यात आली होती़ आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कांदळी फाटा येथील देव पेट्रोलियम येथे पेट्रोल पंपाच्या केबिनकडून पहिल्या क्रमांकाचे डिस्पेन्सिंग युनिटमधील नोझल क्रमांक १ तसेच तिसऱ्या क्रमांकाचे डिस्पेन्सिंग युनिटमधील नोझल क्रमांक २ (मशीनवर) मध्ये पल्सर किटमध्ये फेरफार केली होती़ यावरून देव पेट्रोलियमच्या वतीने ग्राहकांना पेट्रोल व डिझेल प्रमाणापेक्षा कमी वितरीत करून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली जात असल्याची खबर मिळाली. या खबरीवरून ठाणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा ठाणे शहरमधील पोलीस उपनिरीक्षक बेंद्रे, बांगर, पोलीस नाईक ठाकुर, भोगले तसेच आयओसीएलचे सेल्स मॅनेजर प्रसाद साठे, एचपीसीएल एरिया सेल मॅनेजर लोकेश सिंघल, बीपीसीएलचे डेप्युटी सेल मॅनेजर श्रीमती मोनालिसा दत्ता, मिडको कंपनीचे टेक्निशियन हर्षद जाधव, जुन्नर विभागाचे वैधमापन निरीक्षक एच़ एम़ शेख, खेड विभागाचे आऱ आय़ गवंडी, पुणे सिटी-५ विभागचे निरीक्षक एम़ व्ही़ महाजन या सर्वांच्या सामूहिक पथकाने पेट्रोल पंपावर छापा टाकला. यात युनिट क्रमांक १ चे नोझल क्रमांक १ व युनिट क्रमांक ३ चे नोझल क्रमांक ३ यामध्ये वैधमापन विभागाचे विधीग्राह्य त्रुटीपेक्षा जास्त प्रमाणत त्रुटी आढळून आल्या. नोझलचे पल्सर, त्याचे सिल, युनिटचे कंट्रोल कार्ड व त्याचे सिल यांचा पंचनामा करून पुढील तपासणीकामी ताब्यात घेण्यात आले़
या पंपावर कमी इंधन देऊन ग्राहकांची फसवणूक करीत असल्याने निष्पन्न झाले. याप्रकरणी पुढील तपास ठाणे येथील गुन्हे अन्वेषण विभाग करीत आहेत़