जप्त केलेल्या वाळूचा दिवाळीपूर्वी लिलाव
By admin | Published: October 25, 2016 06:30 AM2016-10-25T06:30:00+5:302016-10-25T06:30:00+5:30
हवेली तालुक्यात गेल्या सात-आठ महिन्यांत जप्त करण्यात आलेल्या वाळूचा दिवाळीपूर्वी लिलाव करण्यात येणार आहे. १०० ब्रास वाळू असून, यापैकी ८० ब्रास लिलावासाठी
पुणे : हवेली तालुक्यात गेल्या सात-आठ महिन्यांत जप्त करण्यात आलेल्या वाळूचा दिवाळीपूर्वी लिलाव करण्यात येणार आहे. १०० ब्रास वाळू असून, यापैकी ८० ब्रास लिलावासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी दिली आहे.
गेल्या काही वर्षांत वाळू चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ही वाळूचोरी रोखण्यासाठी महसूल विभागाबरोबरच आरटीओ आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. ही वाळू चोरी रोखण्यासाठी सर्व वाळू घाटांवर बंदी घालणे, चोरीच्या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे आदी अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. वाळू घाटांवर बंदी घातल्यानंतरदेखील चोरीची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये पुणे जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वाळू हवेली तालुक्यात दररोज येत असते. यामुळे हवेली तालुक्यातील सर्व टोल नाक्यांवर चोरीच्या वाळूचे ट्रक मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले. यात एकट्या हवेली तालुक्यात गेल्या सात-आठ महिन्यांत तब्बल १०० ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. ही सर्व वाळू सध्या हवेली प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आली आहे. या वाळूचा आता लिलाव करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)