मतदान यंत्रे झाली सीलबंद!
By admin | Published: October 9, 2014 05:35 AM2014-10-09T05:35:40+5:302014-10-09T05:35:40+5:30
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात निवडणूक विभागाकडून उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मतदान यंत्रे सीलबंद करण्याचे काम पूर्ण
राजगुरुनगर : खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात निवडणूक विभागाकडून उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मतदान यंत्रे सीलबंद करण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी हिंमतराव खराडे आणि तहसीलदार प्रशांत आवटे यांनी दिली. मतदानासाठीची इतरही तयारी झाल्याचे त्यांनी सांगितले.
मतदानासाठी ३३१ मुख्य केंद्रे असून, ३३ साहाय्यकारी केंद्रे आहेत. केंद्रांची तपासणी पूर्ण झाली आहे. मतदारसंघात ३३ विभाग करण्यात आले आहेत. एकूण ४३० मतदान यंत्रे मतदानासाठी वापरण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
मतदान साहित्याचे वाटप, मतदानानंतर ते स्वीकारणे आणि मतमोजणीपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे काम तालुका क्रीडा संकुलात होणार आहे. त्यादृष्टीने तेथे कडक सुरक्षाव्यवस्था, सीसीटीव्ही कमेरे आणि कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात सर्व ३३ विभागांत मतदानाच्या दिवशी प्रत्येकी एक तज्ज्ञ डॉक्टर देण्यात येणार असून, प्रत्येक मतदान केंद्रावर प्राथमिक उपचाराचे सर्व साहित्य मतदानाच्या साहित्याबरोबर देण्यात येणार असल्याची माहितीही हिम्मतराव खराडे व प्रशांत आवटे यांनी दिली. प्रत्येक मतदान केंद्रावर अत्यावश्यक औषधे ठेवण्यात आली आहेत. मतदानाच्या वेळी मतदान कर्मचारी व मतदार यांना त्रास झाल्यास त्यांच्यावर तेथेच प्राथमिक उपचार करण्यात येणार आहे.
मतमोजणीबाबत माहिती देताना हिम्मतराव खराडे व प्रशांत आवटे यांनी सांगितले की, खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू क्रीडासंकुलात घेण्यात येणार आहे. एकूण २२ टेबल लावण्यात येणार असून दि.१९ रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. जवळपास तीन तासांत निकाल हाती येईल. मतमोजणीसाठी संबंधित पक्षाचा उमेदवार, प्रतिनिधी यांनी सकाळी सात वाजताच येथे हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)