ब्रिटनचे ‘त्या’ प्रवाशांचा शोध अजूनही चालू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:12 AM2020-12-31T04:12:13+5:302020-12-31T04:12:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ब्रिटनहून आलेले मात्र त्यांचा पत्ता मिळून येत नसलेल्या १०९ प्रवाशांची यादी महापालिकेकडून बुधवारी (दि. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ब्रिटनहून आलेले मात्र त्यांचा पत्ता मिळून येत नसलेल्या १०९ प्रवाशांची यादी महापालिकेकडून बुधवारी (दि. ३०) पुणे पोलिसांना मिळाली. या यादीच्या छाननीची तांत्रिक प्रक्रिया पोलिसांनी सुरु केली आहे. त्याबाबतची सर्व माहिती गुरुवारी (दि. ३१) महापालिकेला देण्यात येईल, असे गुन्हा शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
लॉकडाऊनच्या काळात पुणे पोलिसांनी ‘काँटँक्ट ट्रेसिंग’द्वारे काही हजार संभाव्य कोरोना बाधितांची माहिती महापालिकेला दिली होती. ब्रिटनमध्ये नव्या स्वरुपातील कोरोना आढळल्यानंतर १ डिसेंबरपासून ब्रिटनहून आलेल्या ५४२ प्रवाशांचा शोध महापालिकेने सुरु केला. मात्र यातल्या १०९ जणांचा शोध अद्याप लागलेला नाही. त्यामुळे यांच्या शोधासाठी महापालिकेने पोलिसांची मदत मागितली आहे.
अशोक मोराळे यांनी सांगितले की, महापालिकेकडून मिळालेल्या यादीतील १०९ प्रवाशांपैकी ६९ जणांचे मोबाईल क्रमांक हे स्थानिक आहेत. चोवीस प्रवाशांचे मोबाईल क्रमांक आंतरराष्ट्रीय आहेत. तर २६ जणांचे मोबाईल क्रमांक सापडत नाहीत. या सर्व क्रमांकांचे विश्लेषण पूर्ण झाल्यानंतर महापालिकेला कळवण्यात येईल.