गावपुढारी प्रचारात आणि मतदार पाण्याच्या शोधात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 11:32 PM2019-04-01T23:32:15+5:302019-04-01T23:32:32+5:30
शिरूर लोकसभेसाठी अद्याप कोणीही उमेदवारी अर्ज भरलेले नाहीत. तरीही सध्याच्या कडक उन्हाच्या तडाख्यात संभाव्य उमेदवार व त्यांंचे कार्यकर्ते मतांच्या बेगमीसाठी जोमाने प्रचाराला लागले आहेत
लोणी काळभोर : लोकसभा निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. अद्याप प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली नसली, तरीही प्रत्येक राजकीय पक्षाचे गावपुढारी आताच निवडणुकीच्या प्रवाहात वाहून जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ते गटातटाची मोर्चेबांधणी करून मतांची याचना मतदार राजाकडे करताना दिसत आहेत. मात्र, त्याच वेळी दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे मतदारांना लांबपर्यंत पायपीट करावी लागत आहे. त्याकडे उमेदवार व पक्षीय कार्यकर्ते दुर्लक्ष करीत तो दोष एकेमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, एकूणच गावपुढारी प्रचारात आणि मतदार पिण्याच्या पाण्याच्या शोधात, अशी परिस्थिती पूर्व हवेलीतील बहुतांश गावागावांतून निर्माण झाली आहे.
शिरूर लोकसभेसाठी अद्याप कोणीही उमेदवारी अर्ज भरलेले नाहीत. तरीही सध्याच्या कडक उन्हाच्या तडाख्यात संभाव्य उमेदवार व त्यांंचे कार्यकर्ते मतांच्या बेगमीसाठी जोमाने प्रचाराला लागले आहेत. पाच वर्षांतून एकदा येणाऱ्या निवडणुकांत काही जण आपली निष्ठा बाजूला ठेवून आमिषाला बळी पडल्याचे चित्र समोर दिसत आहे. तसेच, गावातले स्थानिक पुढारी केवळ स्वार्थासाठी निवडणूक रिंगणातील उमेदवारांसोबत फिरताना दिसत आहेत. त्यांना आपल्या गावातील मूलभूत सुविधांचा मात्र विसर पडला आहे. पूर्व हवेलीतील लोणी काळभोरसह कदमवाकवस्ती, उरुळी कांचन, थेऊर, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची व बहुतांश गावांत आणी वाड्यावस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी, महिलांना पाण्यासाठी उन्हातान्हात भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे महिलावर्गात तीव्र असंतोष आहे. या भागात मूलभूत सुविधांची कमतरता कायमचीच राहिली आहे. ऐन उन्हाळ्यात गावातील नळपाणी पुरवठा करणारे जलकुंभ, कूपनलिकांना पाणी नसल्याने पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील पुढारी म्हणवणाऱ्या लोकांना याचे काहीच सुख-दुख: नाही. केवळ राजकीय स्वार्थापोटी मतांची याचना करताना ते दिसत आहेत. या भागाला दर वर्षीच पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. परंतु, यावर आजअखेर कोणत्याही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीकडून ठोस उपाययोजना राबवली गेली किंवा आखण्यात आलेली नाही. यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थही विहिरी, शेतामधील कूपनलिका, तलाव परगावातील कूपनलिकेतील पाणी आणत आहेत. पण, हे किती दिवस चालणार? एखाद्या गावात पाण्यााचा टँकर आला तर शेकडो हंंडे, घागरींची रांग लागते. अनेकांना तर रांगेत ताटकळत थांबून शेवटी पाणी अपुरे पडल्याने रिकाम्या हाताने परतावे लागते. पूर्व हवेलीमध्ये एका बाजूला मुुुळा-मुठा नदी, तर दुसºया बाजूूूला नवीन मुठा उजवा कालवा या दोन्हींच्या मध्ये ही गावे आहेत. परंतु, नदीच्या पाण्यात पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकांच्या नागरिकांचे मैलामिश्रित पाणी व कारखान्यातून बाहेर पडलेली रासायनिक घाण मिसळत असल्याने नदीचे पाणी प्रदूषित होते. उन्हाळ्याचे आवर्तन नसल्याने कालवा कोरडा पडलेला. यामुळे या परिसरातील नागरिकांची ‘पाणी उशाला, पण कोरड घशाला’ अशी अवस्था झाली आहे. हे सर्व समजत असतानाही या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी खासदार, आमदार, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांबरोबर ग्रामस्थांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. तसेच, भागातील लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन या जीवनावश्यक कामाला गती देणे आवश्यक आहे.
केवळ कट्ट्यावर बसून राजकारणाची चर्चा करण्यात गावातील युवक व नागरिक धन्यता मानत आहेत. या कारणांमुळे अत्यावश्यक असलेल्या पाण्याची समस्या उग्र रूप धारण करीत आहे.
वैरत्वाच्या राजकारणामुळे पाणीप्रश्न प्रलंबित
४उरुळी कांचनसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावात माजी आमदार अशोक पवार यांनी त्यांच्या काळात तत्कालीन पाणीपुरवठामंत्री दिलीप सोपल यांच्याकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत त्या वेळी विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी एक दिवस दोन टप्प्यांत निधी मंजूर करून घेण्यात यश मिळवले होते. परंतु, प्राधिकरणाने पाण्याचे स्रोत शोधण्यास प्राधान्य न देता पाणी वितरणाला प्राधान्य देऊन मंजुरी दिली. यामुळे ग्रामपंचायतीतील स्थानिक विरोधकांनी या अर्धवट योजनेच्या कामाला विरोध करून कामास सुरुवात होऊ दिली नाही.
विद्यमान आमदार बाबूराव पाचर्णे यांनी याचा पाठपुरावा केला. विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. तरीही सदर महत्त्वाच्या कामाची मंजुरी लालफितीत अडकून पडली आहे. सदर योजना पूर्णत्वास गेली तर उरुळी कांचन हे गाव पाण्याबाबत कायमस्वरूपी स्वयंपूर्ण होईल. परंतु, यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. नाही तर निवडणुका येतील आणि जातील; परंतु गावागावांतील पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न असाच रेंगाळलेल्या अवस्थेत राहील.
दुष्काळाचा दाह वाढला : जगण्या-मरण्याच्या प्रश्नाला बगल; पाण्याच्या प्रश्नावर एकमेकांवर आरोपांच्या फैरी