संततधार पावसाचा फळभाज्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:54 AM2018-08-27T00:54:44+5:302018-08-27T00:55:02+5:30
दरामध्ये वाढ : ढोबळी मिरची, फ्लॉवर, मटारचे दर वाढले ;मोठ्या प्रमाणात शेतमाल बाजारात
पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून, पावसामुळे शेतमालाची तोडणीच रखडली आहे. याचा परिणाम शेतमालाची आवक कमी होऊन, फळभाज्यांच्या दरामध्ये दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात शेतमाल बाजारात दाखल होत असल्याने कांदा व हिरव्या मिरचीच्या भावात घट झाली आहे.
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डामध्ये रविवारी (दि.२६) सुमारे १५० ते १६० ट्रक शेतमालाची आवक झाली. यामध्ये परराज्यासह जिल्ह्यातील शेतीमालाचा समावेश आहे. परराज्यातून प्रामुख्याने कर्नाटक, गुजरात येथून ५ ते ६ ट्रक कोबी, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथून २० ते २२ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून २ ते ३ टेम्पो शेवगा, इंदूर येथून ५ ते ६ टेम्पो गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाच्या साडेचार ते पाच हजार गोणी इतकी आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आले दोन हजार पोती, टॉमेटोे चार ते साडेचार हजार पेटी, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी ७ ते ८ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, भेंडी १० ते १२ टेम्पो, शेवगा ३ ते ४ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, हिरवी मिरची ५ ते ६ टेम्पो, मटार २०० ते २५० गोणी, काकडी ८ ते १० टेम्पो, कारली ७ ते ८ टेम्पो, पावटा ३ ते ४ टेम्पो, भुईमूग १०० ते १२५ पोती, कांद्याची १०० ट्रक, आग्रा, इंदूर आणि तळेगाव येथून बटाट्याची ६० ट्रक इतकी आवक झाली
पालेभाज्यांचे दर स्थिर
पावसामुळे पालेभाज्यांचा दर्जा काही प्रमाणात खालावला आहे. परंतु श्रावण महिन्यामुळे पालेभाज्यांना मागणी कायम असून, पुरवठादेखील चांगला आहे. यामुळे पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. रविवारी येथील तरकारी विभागात कोथिंबिरीची दीड लाख तर मेथीची ६० हजार जुडींची आवक झाली. कोथिंबिरीच्या जुडीला किरकोळ बाजारात दर्जानुसार १० ते १५ रुपये जुडी, तर मेथीची १० ते २० रुपये भावाने जुडीची विक्री होत आहे.