Ramdas Athawale: भाजपचे नेते संविधान बदलाची भाषा बोलले म्हणून जागांचा फटका बसला - रामदास आठवले
By प्रशांत बिडवे | Published: July 11, 2024 06:50 PM2024-07-11T18:50:45+5:302024-07-11T18:53:13+5:30
पंतप्रधान नरेंद्र माेदी अथवा इतर कुणीही भारताचे संविधान बदलू शकत नाही, आठवलेंनी स्पष्टपणे सांगितले
पुणे : लाेकसभा निवडणुकीदरम्यान भाजप पुन्हा सत्तेत आला तर संविधान बदलणार या चर्चेला उधाण आले हाेते. याचवेळी भाजपचे काही नेतेही संविधान बदलाची भाषा बाेलले त्यामुळे जागांचा फटका बसला. पंतप्रधान नरेंद्र माेदी अथवा इतर कुणीही भारताचे संविधान बदलू शकत नाही असे आठवले यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
एस.पी काॅलेज येथील लेडी रमाबाई हाॅलमध्ये आयाेजित विद्यार्थी संवाद परिषदेत मंत्री रामदास आठवले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अभ्यासपूर्ण अन मनाेरंजक शैलीत उत्तरे दिली. सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्यामुळे त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यासह रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अॅड. एस.के.जैन यांना ‘भिमाई भूषण जीवन गाैरव पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी आमदार अॅड. एल. टी. सावंत, शि.प्र. मंडळी परिषद सदस्य केशव वझे, श्रमिक ब्रिगेडचे अध्यक्ष डाॅ. सतिश केदारी, संघमित्रा गायकवाड, प्राचार्य सुनिल गायकवाड आदी उपस्थित हाेते.
देशातील हिंदू-मुस्लिम वाद कमी व्हावा तसेच वाढत्या लाेकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी समान नागरी कायद्याची गरज आहे, असे मत आठवले यांनी व्यक्त केले. तसेच सरकारी क्षेत्राचे खासगीकरण करू नये आणि केलेच तर तेथेही सर्व घटकांना नाेकरीसाठी आरक्षण लागू करावे यांसह जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी आमची आग्रही भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तर रिपाइंला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता
मणिपूर आणि नागालॅण्डमध्ये रिपाईंचे प्रत्येकी दाेन आमदार निवडून आले आहेत. मणिपूर राज्यात रिपाइंला सतरा टक्के मते मिळाले आहेत. आणखी दाेन राज्यात सहा टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली तर पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.