दुसऱ्या खटल्यातही १0 वर्षे सक्तमजुरी
By Admin | Published: September 29, 2016 05:55 AM2016-09-29T05:55:44+5:302016-09-29T05:55:44+5:30
जुन्नर तालुक्यातील अणे येथील भाऊसाहेब बोरा अपंगकल्याण केंद्रातील गाजलेल्या बलात्कार प्रकरणातील दुसऱ्या खटल्याचाही बुधवारी निकाल लागला. या खटल्यात
राजगुरुनगर : जुन्नर तालुक्यातील अणे येथील भाऊसाहेब बोरा अपंगकल्याण केंद्रातील गाजलेल्या बलात्कार प्रकरणातील दुसऱ्या खटल्याचाही बुधवारी निकाल लागला. या खटल्यात सातवीतील अपंग मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार करणारा आरोपी, महादेव आसराजी बोऱ्हाडे (वय ५४, मूळ रा. बालम टाकळी, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) याला राजगुरुनगरचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
या बलात्कार प्रकरणातील एका अपंग मुलीसंदर्भातल्या खटल्याचा निकाल कालच लागला होता आणि याच आरोपीला न्यायाधीशांनी जन्मठेप सुनावली होती. एकूण ३ मुलींच्या तक्रारीवरून ३ खटले चालू होते. आता २ खटल्यांचा निकाल लागला असून उर्वरित एका खटल्याचा निकाल शुक्रवारी लागेल.
याबाबतची हकीकत अशी, अणे येथील भाऊसाहेब बोरा अपंगकल्याण केंद्रात अनेक अपंग विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. आरोपी महादेव बोऱ्हाडे हा या केंद्रात शिपाई म्हणून कामाला होता. त्याने पाचवीतील एका अपंग मुलीवर आधी बलात्कार केला होता. त्याच पद्धतीने त्याने या सातवीत शिकणाऱ्या मुलीला ५ फेब्रुवारी २०१३ रोजी १२ वाजता ती वर्गात असताना तुझ्याकडे काम आहे, असे खोटे सांगून धान्य ठेवण्याच्या कोठीत नेले. तेथे दमबाजी करून तिच्यावर बलात्कार केला. तसेच, ही गोष्ट कोणाला सांगितल्यास जिवे मारीन, अशी धमकीदेखील दिली. दुर्दैव म्हणजे, ही पीडित मुलगी ८० टक्के अपंग आहे. त्या दिवशी त्या केंद्रातील बहुतांश शिक्षक आणि कर्मचारी सहलीला गेले होते. त्यामुळे मुलीने दोन दिवस ही गोष्ट कोणाला सांगितली नाही. दोन दिवसांनी तिने ही गोष्ट ‘केअरटेकर’ मावशीला सांगितली. त्यांनी ही बाब वरिष्ठांना सांगितल्यावर पीडित मुलीला दवाखान्यात नेऊन तपासणी करण्यात आली होती.
त्यानंतर पीडित मुलीने नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून तत्कालीन पोलीस निरीक्षक एन. एम. सारंगकर यांनी तपास केला आणि आरोपी बोऱ्हाडे याच्यासह संस्थाचालक, शिक्षक मिळून ७ जणांवर गुन्हा दाखल केला होता. राजगुरुनगरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हा खटला चालू होता. सरकारी वकील म्हणून अॅड. अरुण ढमाले यांनी काम पहिले. (वार्ताहर)
उर्वरित आरोपी दोषमुक्त
या खटल्यात सहआरोपी असलेले शिक्षक सावळेराम सीताराम पाचारणे आणि लेखापाल हिरालाल गोकुळदास बाबेल यांना न्यायालयाने दोषमुक्त केले. एक आरोपी वसंत गिते यांचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणातील उर्वरित आरोपींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि त्यांना उच्च न्यायालयाने दोषमुक्त केले होते.
सर्व शिक्षा एकाच वेळी भोगावी लागेल
आरोपीला बलात्काराच्या आरोपाखाली भा.दं.वि. कलम ३७६नुसार १० वर्षे सक्तमजुरी व ३ हजार रुपये दंड आणि तो न भरल्यास ६ महिने कारावासाची शिक्षा सुनावली आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल कलम ५०६नुसार २ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड आणि तो न भरल्यास २ महिने शिक्षा सुनावली.
आरोपीला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलम ४ व ६नुसार १०-१० वर्षे सक्तमजुरी व २ हजार रुपये दंड आणि तो न भरल्यास ६ महिने कारावास; तसेच या कायद्याच्या कलम ८ नुसार ३ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड आणि तो न भरल्यास २ महिने कारावास, कलम १० नुसार ५ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड आणि तो न भरल्यास २ महिने कारावास, अशीही शिक्षा सुनावली. या सर्व शिक्षा आरोपीला एकाच वेळी भोगायच्या आहेत, असे न्यायालयाने निकालात नमूद केले. तसेच, दंडाची रक्कम मुलीला देण्यात येईल, असे निकालात सांगितले.