डिंभेतून दुसरे आवर्तन सोडले
By admin | Published: January 31, 2015 12:25 AM2015-01-31T00:25:45+5:302015-01-31T00:25:45+5:30
: डिंभे धरणातून यंदाचे दुसरे आवर्तन सुरू झाले आहे. सध्या धरणाच्या उजव्या कालव्यातून ५६०, तर डाव्या कालव्यातून १९० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे
डिंभे : डिंभे धरणातून यंदाचे दुसरे आवर्तन सुरू झाले आहे. सध्या धरणाच्या उजव्या कालव्यातून ५६०, तर डाव्या कालव्यातून १९० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. यापैकी पॉवर हाऊसमधून ७००, तर आऊटलेटमधून ५० क्युसेक्स पाणी वळविण्यात आले आहे. दररोज डिंभे धरणातून ७५० क्युसेक्सच्या गतीने विसर्ग सुरू आहे. सध्या धरणात ६१ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.
आजतागायत या धरणाची पाणीपातळी ७९०.०५ वर आली असून, धरणात ६१ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. डाव्या कालव्यामधून सोडले जाणारे पाणी हे येडगाव धरणात सोडण्यात येते. पुढे ते कर्जत, पारनेर या नगर जिल्ह्यातील व करमाळा (जि. सोलापूर) तालुक्यातील गावांपर्यंत पोहोचविले जाते. उजव्या कालव्यातून सोडण्यात येत असलेले पाणी हे घोडशाखा कालव्यामधून आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील घोडेगाव, मंचर, निरगुडसर, लौकी, थोरांदळे मार्गे जांबूत, टाकळी हाजीमार्गे शिरूर तालुक्यातील गावांना सिंचनासाठी दिले जाते.
डिंभे धरण १०० टक्के भरले होते. यंदाच्या हंगामात आक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान या धरणातून पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. या वेळी धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली. दुसऱ्या आवर्तनापर्यंत पाणीसाठा ६१ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. आजतागायात या धरणात ६१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. २४ जानेवारीपासून धरणाच्या डाव्या कालव्यातून ५५० क्युसेक्स पाणी सुरू होते. काल (दि. २९) संध्याकाळी त्यात १० क्युसेक्सने वाढ केली आहे. याच वेळी उजवा कालवाही सुरू करण्यात आला असून, या कालव्यातून १९० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. एकंदरीत, धरणातून सध्या दररोज ७५० क्युसेक्स पाणी बाहेर सोडण्यात येत असल्याची माहीती डिंभे धरण शाखा अभियंत्यांकडून मिळाली आहे. सोडण्यात येत असलेल्या पाण्याचा उपयोग नगर व पुणे याजिल्ह्यांतील हजारो हेक्टर शेतीक्षेत्राला सिंचनासाठी होणार आहे. (वार्ताहर)