Pune Vaccination: लस 'न घेणे' ठरू शकते घातक; जिल्ह्यात ११ लाख नागरिकांचा दुसरा डोस बाकी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 06:37 PM2022-01-12T18:37:58+5:302022-01-12T18:42:50+5:30
जिल्ह्यात ११ लाख नागरिकांचा कोव्हीशिल्डचा, तर ७३ हजार जणांचा कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस बाकी आहे
पुणे : लसीकरणामुळे तिसऱ्या लाटेत बहुतांश रुग्णांना सौम्य संसर्ग होत असल्याचा निर्वाळा वैद्यकतज्ज्ञांनी दिला आहे. पुणे जिल्ह्याने ८ डिसेंबर २०२१ रोजी पहिल्या डोसचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. आता जिल्ह्यात ११ लाख नागरिकांचा कोव्हीशिल्डचा, तर ७३ हजार जणांचा कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस बाकी आहे. राज्यात १ ते ११ जानेवारीदरम्यान ६ लाख ५४ हजार ४४६ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, जिल्ह्यात ८० टक्के नागरिकांचा दुसरा डोस बाकी आहे. पहिला डोस पूर्ण करणारा पुणे हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याने आणि ओमायक्रॉनच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील नागरिकांना लसीचा पहिला डोस तर १० जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना तिसरा डोस देण्यास सुरुवात करण्यात आली. त्याचबरोबर, दुसरा डोस राहिलेल्या नागरिकांशी संपर्क साधून लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना राज्य शासनातर्फे देण्यात आल्या आहेत.
राज्यात कोव्हीशिल्डचा दुसरा डोस राहिलेले सर्वाधिक लाभार्थी पुणे जिल्ह्यात, तर सर्वात कमी लाभार्थी वाशीम जिल्ह्यात आहेत. कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस बाकी असलेले सर्वाधिक लाभार्थी बुलढाणा जिल्ह्यात, तर सर्वात कमी सांगली जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्हा नवव्या क्रमांकावर आहे. लसीचा पहिला डोस राहिलेले सर्वाधिक लाभार्थी ठाणे जिल्ह्यात, तर सर्वात कमी लाभार्थी भंडारा जिल्ह्यात आहेत.
कोव्हीशिल्डचा दुसरा डोस बाकी असलेले लाभार्थी :- ११ लाख ८ हजार ५७७
कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस बाकी असलेले लाभार्थी :- ७३ हजार ४१३