को-व्हॅक्सीनच्या पहिल्या डोसचे प्रमाणपत्र दाखवूनही नाकारला दुसरा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:11 AM2021-04-17T04:11:04+5:302021-04-17T04:11:04+5:30
पुणे: को-व्हॅक्सीनच्या पहिल्या डोसनंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील ...
पुणे: को-व्हॅक्सीनच्या पहिल्या डोसनंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील १६० केंद्रांवर दुसऱ्या डोसला सुरुवात झाली. पण लायगुडे रुग्णालयात पहिल्या डोसचे प्रमाणपत्र दाखवूनही दुसरा डोस देण्यास नकार देण्यात आला. कारण रूग्णालयाकडे संबंधित व्यक्तीची माहिती उपलब्ध नव्हती. पण पहिला डोस घेतल्याची कागदपत्रे दाखवूनही त्यांना दुसरा डोस दिला नसल्याची तक्रार ज्येष्ठ नागरिक विलास शाळिग्राम यांनी ‘लोकमत’ला सांगितली.
विलास शाळिग्राम यांच्या पत्नीने २८ दिवसांपूर्वी को-व्हॅक्सीनचा पहिला डोस घेतला होता. आज त्यांच्या दुसऱ्या डोसची तारीख आली होती. त्यांच्या पत्नीबरोबरच सोसायटीतील महिलांनाही आजच डोस मिळणार होते. सर्व महिलांनी दुसरा डोस घेतला. त्यानंतर शाळिग्राम यांच्या पत्नीचा नंबर आला. त्यांच्याकडे पहिल्या डोसचे प्रमाणपत्र, आधारकार्ड सर्व असूनही दुसरा डोस नाकारण्यात आला. यावर शाळिग्राम यांनी आम्हाला दुसरा डोस का मिळणार नाही? असा प्रश्न उपस्थित केल्यावर रुग्णालयाकडून नकाऱाचे उत्तर देण्यात आले. या घटनेबाबत त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
शाळीग्राम म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाच्या अशा गंभीर परिस्थितीत घराबाहेर पडणे धोक्याचे आहे. आम्ही फक्त महत्त्वाच्या कामासाठीच बाहेर येतो. सद्यस्थितीत लस घेण्यासाठी आम्ही नोंदणी करूनच रुग्णालयात जात आहोत. पहिला डोस मिळण्यात काही अडचणी आल्या नाहीत. मग दुसऱ्याच्या वेळी का नकार दिला जात आहे. प्रत्येक माणसाच्या बाबतीत असे घडत नाही. पण लसींचा तुटवडा जाणवू लागल्याने सामान्य माणसाला लस मिळणे अवघड झाले आहे. अशा वेळी त्या व्यक्तीने कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्न त्यांनी या वेळी उपस्थित केला आहे.