Omicron Variant: पुण्यात आढळला ओमायक्रॉनचा दुसरा रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 07:56 PM2021-12-13T19:56:10+5:302021-12-13T20:08:06+5:30
महिला दुबईहून पुण्यात दाखल झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे
पुणे : दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटने आता महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर मुंबईत १०, पिंपरी चिंचवडमध्ये १०, पुणे शहरात २, डोंबिवलीमध्ये १, नागपूरमध्ये १ आणि लातूरमध्ये १ असे रुग्ण आढळून आले होते. तर आज पुणे शहरात ओमायक्रॉनचा दुसरा रुग्ण आढळून आला आहे. त्यानंतर आता प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, पुण्यामध्ये कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. पुण्यातील ३९ वर्षीय महिलेला ओमायक्रॉनची लागण झाली असून, ही महिला दुबईहून पुण्यात दाखल झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. महिलेला सध्या कोणतीही लक्षणे नसून, तिचे लसीकरण पूर्ण झाले आहे. महिलेला सध्या विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
ओमायक्रॉनबाधित महिलेच्या संपर्कातील तीन जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. तिघांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पुण्यातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या आता २ झाली आहे. पुण्यातील ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण दोन दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झाला आहे. फिनलँड येथून आलेल्या ४७ वर्षीय पुरुषाला ओमायक्रॉनची लागण झाली होती. दहा दिवसांनी पुन्हा चाचणी केल्यानंतर रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे निदान झाले.
आतापर्यंत राज्यात २० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. यापैैकी मुंबईत १०, पिंपरी चिंचवडमध्ये १०, पुणे शहरात २, डोंबिवलीमध्ये १, नागपूरमध्ये १ आणि लातूरमध्ये १ अशा रुग्णांचा समावेश आहे. यापैैकी ९ जणांना आरटीपीसीआर चाचणी करुन घरी सोडण्यात आले आहेत.
पुणे, मुंबई आणि नागपूर विमानतळावर १ डिसेंबरपासून आजपर्यंत अतिजोखमीच्या देशांतून १२,९९६ प्रवासी, तर इतर देशांतून ७१,०८२ असे एकूण ८५ हजार ७८ प्रवासी दाखल झाले. त्यापैैकी १४ हजार ७७७ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. जनुकीय तपासणीसाठी अतिजोखमीच्या देशातील २४ तर इतर देशांमधील ८ अशा ३२ रुग्णांचे नमुने पाठवण्यात आले आहेत.