पुण्यात आजपासून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:13 AM2021-01-19T04:13:46+5:302021-01-19T04:13:46+5:30
पुणे : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा मंगळवारपासून (दि. १९) सुरु होत आहे. पहिल्या टप्प्यात १६ जानेवारीला पुण्यात ५८ ...
पुणे : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा मंगळवारपासून (दि. १९) सुरु होत आहे. पहिल्या टप्प्यात १६ जानेवारीला पुण्यात ५८ टक्के लसीकरण झाले. को-विन अॅपवर नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण मंगळवार ते शनिवार असे चार दिवस होणार आहे.
सोमवार आणि गुरुवारचा दिवस ‘को विन’ अॅपवर माहिती अपलोड करण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी जे आरोग्य कर्मचारी उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांना पुन्हा एकदा लस घेण्याची संधी मिळणार आहे, असे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.
दरम्यान, १६ जानेवारीला पुणे जिल्ह्यात ३१ केंद्रांवर १८०२ कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यात पुणे ग्रामीणमधील केवळ एका व्यक्तीला लसीकरणानंतर गंभीर दुष्परिणाम जाणवले. ५८ व्यक्तींना अंगदुखी, ताप, हाताला सूज अशा सौम्य तक्रारी जाणवल्या. आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.