स्मार्ट सिटी दुसरा टप्पा आजपासून
By admin | Published: October 6, 2015 04:57 AM2015-10-06T04:57:54+5:302015-10-06T04:57:54+5:30
स्मार्ट पुणे कसे असावे, याबाबत नागरिकांकडून सूचना, संकल्पना जाणून घेतल्या जात आहेत, याचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पाडल्यानंतर आता महापालिकेच्या वतीने
पुणे : स्मार्ट पुणे कसे असावे, याबाबत नागरिकांकडून सूचना, संकल्पना जाणून घेतल्या जात आहेत, याचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पाडल्यानंतर आता महापालिकेच्या वतीने दुसऱ्या टप्प्याला सोमवारपासून सुरूवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नागरिकांनी सर्वाधिक महत्त्वाचे प्रश्न म्हणून निवडलेल्या विषयांवर दुसऱ्या टप्प्यांमध्ये अधिक तपशिलामध्ये मते नोंदविण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. तसेच यामध्ये सर्वाधिक सहभाग नोंदविणाऱ्या पुणेकरांवर महापालिकेकडून बक्षिसांची खैरात केली जाणार आहे.
महापालिका आयुक्त कुणाल कुमार म्हणाले, ‘‘स्मार्ट सिटीचा प्रस्ताव तयार करताना नागरिकांच्या सूचना महापालिकेकडून जाणून घेतल्या जात आहेत. पालिकेने राबविलेल्या पहिल्या टप्प्यामध्ये ३ लाख ७ हजार कुटुंबांनी सहभाग घेऊन अर्ज भरून दिले आहेत. त्यानुसार नागरिकांचा प्राधान्यक्रम महापालिकेकडून निश्चित करण्यात आला आहे. ’’
वाहतूक आणि दळणवळण, पाणी व मलनि:सारण, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण व शाश्वत उपाय, सावधानता व सुरक्षा, ऊर्जा व वीजपुरवठा हे प्रमुख ६ विषय निवडण्यात आले आहेत. यासंबंधी प्रश्न सोडविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, यावर पुणेकरांना त्यांची मते व्यक्त करण्याची संधी दुसऱ्या टप्प्यात देण्यात आली आहे. ही संधी १२ आॅक्टोबर २०१५ पर्यंत पुणेकरांना उपलब्ध असणार आहे, असे कुमार यांनी सांगितले.
दुसऱ्या टप्प्यामध्ये सहभागी होण्यासाठी ‘पुणे स्मार्टसिटी’ या पालिकेच्या संकेतस्थळावर आॅनलाइन फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामध्ये ६ विषय दर्शविण्यात आले असून, त्यावर क्लिक करून तपशिलामध्ये मते व्यक्त करता येणार आहेत. ज्यांना आॅनलाइन पद्धतीने सहभाग घेण्यास अडचणी आहेत त्यांच्यासाठी महाविद्यालयांचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व पालिकेचे कर्मचारी टॅब घेऊन सार्वजनिक ठिकाणी फिरणार आहेत. त्यांच्या मदतीने नागरिकांना मते नोंदविता येणार आहेत. बस स्टँड, रेल्वे स्थानक यांसह सोसायटी, वस्त्यांमध्ये ते फिरणार आहेत.
स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, याकरिता महापालिकेच्या वतीने पुणेकरांना बक्षिसे दिली जाणार आहेत. स्वत:चे नाव रजिस्टर करून आॅनलाइन पद्धतीने मत व्यक्त केल्यानंतर पुणेकरांना विशिष्ट पॉइंट व एक कोड नंबर मिळणार आहे. त्यानंतर त्यांनी इतरांना याची माहिती देऊन त्यांना आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यास सांगायचे आहे. त्या वेळी त्यांना देण्यात आलेला कोड नंबर टाकून संबंधितांनी अर्ज भरायचा. प्रत्येक अर्जाच्या संख्येनुसार त्या पॉइंटमध्ये वाढ होत जाणार आहे.
- कुणाल कुमार, आयुक्त