दुसऱ्या फेरीत सर्वांनाच संधी
By admin | Published: July 17, 2017 04:04 AM2017-07-17T04:04:29+5:302017-07-17T04:04:29+5:30
इयत्ता अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीमध्ये अद्याप आॅनलाईन अर्ज न केलेल्या तसेच अर्जाचा दुसरा भाग अपूर्ण भरलेल्या विद्यार्थ्यांनाही
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : इयत्ता अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीमध्ये अद्याप आॅनलाईन अर्ज न केलेल्या तसेच अर्जाचा दुसरा भाग अपूर्ण भरलेल्या विद्यार्थ्यांनाही संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना अर्जाच्या दुसऱ्या भागात महाविद्यालयांचे पसंतीक्रम, इतर माहितीत बदल करता येणार असून, त्यासाठी दि. १८ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
केंद्रीय प्रवेश समितीमार्फत केंद्रीय पद्धतीने अकरावी प्रवेशाची आॅनलाईन प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेतील पहिली प्रवेश फेरी शुक्रवारी पूर्ण झाली. या फेरीत ४८ हजार ३१५ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली होती. त्यापैकी २४ हजार ६७२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पहिला पसंतीक्रमानुसार निवड झालेल्या १९ हजार ९८९ विद्यार्थ्यांपैकी ४ हजार ८७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही. समितीच्या निर्णयानुसार या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत सहभागी होता येणार नाही. या फेरीत अद्याप आॅनलाईन अर्ज न केलेले, दुसरा भाग अपूर्ण भरलेले तसेच पहिल्या फेरीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल.
आॅनलाईन अर्ज भरणे तसेच अर्जात बदल करण्यासाठी दि. १८ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. शनिवारी दुपारी रिक्त जागांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच अर्जात बदल करण्यासाठीही लिंक सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचे दहावीचे बैठक क्रमांक ब्लॉक केले जाणार आहे. त्यामुळे अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनी नवीन माहिती पुस्तिका घेऊन नव्याने पुन्हा अर्ज भरू नये, असे समितीच्या सचिव मीनाक्षी राऊत यांनी स्पष्ट केले.
असा बदला पसंतीक्रम
विद्यार्थ्यांना आपल्या लॉगीनमध्ये जाऊन माय प्रोफाईल यातील एडिट युवर चॉईस या लिंकवर जावे लागेल. पसंती क्रमात बदल करण्यापूर्वी प्रिंट या बटनवर क्लिक करू नये. अन्यथा जुने पसंतीक्रम कायम राहतील. चॉईस फॉर सेंट्रलाईज्ड या पानावर पसंतीक्रमांचा क्रम बदलणे किंवा यापैकी काही काढून टाकणे किंवा काही नव्याने समाविष्ट करणे या प्रकारचे बदल करता येतील. आवश्यक बदल केल्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक करावे. हे बदल मान्य आहेत का, अशी विचारणा होईल. मान्य असल्यास ओके बटनवर क्लिक करावे. नसल्यास कॅन्सल करून नव्याने बदल करावेत.