आरटीईची दुसरी फेरी सोमवारी
By admin | Published: March 26, 2017 02:06 AM2017-03-26T02:06:32+5:302017-03-26T02:06:32+5:30
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात
पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची लॉटरी येत्या सोमवारी (दि. २७) काढली जाणार आहे. दुसऱ्या फेरीतून प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांनी येत्या ३ एप्रिलपर्यंत संबंधित शाळेत जाऊन प्रवेश घेणे आवश्यक आहे, असे पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी मुश्ताक शेख यांनी सांगितले.
शालेय शिक्षण विभागातार्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आरटीई प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण १५ हजार ६९३ जागांसाठी ३६ हजार ९३३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यानंतर पुणे शहर व पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील शाळांमधील प्रवेशासाठी लॉटरी काढण्यात आली होती. पहिल्या फेरीतून १३ हजार २४३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले होते. त्यातील ७ हजार १४५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे पहिल्या फेरीतून सुमारे ५० टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. परंतु, हजारो विद्यार्थी अद्याप प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. शिक्षण विभागाकडून सोमवारी आरटीई प्रवेशाची दुसरी लॉटरी काढली जाणार आहे. या फेरीतून प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे शाळांची माहिती कळविण्यात येईल. एसएमएस प्राप्त झाल्यानंतर पालकांनी त्वरित संबंधित शाळेशी संपर्क साधून प्रवेश घ्यावा, असे आवाहन शेख यांनी केले आहे.
पहिल्या फेरीतून प्रवेश मिळूनही ३ हजार ६३४ विद्यार्थ्यांनी संबंधित शाळांशी संपर्क साधला नाही. तर २ हजार ७१ विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळांमध्ये प्रवेश घेतला. तसेच प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र सादर न केल्याने ३९६ विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारण्यात आला, असेही शेख यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)