विद्यापीठाच्या द्वितीय सत्राच्या परीक्षा सुरळीत सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:15 AM2021-07-14T04:15:14+5:302021-07-14T04:15:14+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पुणे, अहमदनगर व नाशिक या तीनही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जात ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पुणे, अहमदनगर व नाशिक या तीनही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जात आहे. द्वितीय सत्राच्या परीक्षेसाठी ६ लाख १८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील ७६ हजार ९६९ विद्यार्थी सोमवारी परीक्षा देणार होते. त्यातील ७४ हजार ७७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
या परीक्षेदरम्यान परीक्षेचे वेळापत्रक, युजर आयडी, पासवर्ड, प्रवेशपत्र आदींची माहिती विचारण्यासाठी ३५० विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधला तर, ४५० विद्यार्थ्यांच्या चॅट रिक्वेस्ट आल्या. ऑनलाईन परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कोणत्याही तांत्रिक अडचणी आल्या नाहीत, असे परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे म्हणाले, विद्यापीठातर्फे सोमवारपासून सुरळीतपणे द्वितीय सत्राच्या परीक्षा सुरू झाल्या. युजर आयडी, पासवर्ड व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी आल्या नाहीत. एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशन व परीक्षा विभागातील कर्मचारी विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचणी येऊ नयेत, याबाबत काळजी घेत आहेत.