१२ जुलैपासून होणार द्वितीय सत्राच्या परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:08 AM2021-06-30T04:08:12+5:302021-06-30T04:08:12+5:30
पुणे : द्वितीय सत्राची परीक्षा बहुपर्यायी पद्धतीने (एमसीक्यू) घेण्यात येणार आहे. १२ जुलैपासून ही परीक्षा होणार असल्याचे सावित्रीबाई फुले ...
पुणे : द्वितीय सत्राची परीक्षा बहुपर्यायी पद्धतीने (एमसीक्यू) घेण्यात येणार आहे. १२ जुलैपासून ही परीक्षा होणार असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने स्पष्ट केले. याबाबत मंगळवारी वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.
परीक्षा वेळेत सुरू होणार आहे. तसेच, महिनाभरात निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी सांगितले. परीक्षा विभागाने पहिल्या टप्प्यात अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. तसेच, सर्व पदविका अभ्यासक्रमाचे वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध केले आहे. त्यानंतर पदवी व पदव्युत्तरच्या अन्य वर्षातील अभ्यासक्रमाचे वेळापत्रक दोन दिवसांत प्रसिद्ध होईल. त्यानुसार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेची तयारी करण्याचे आवाहन केले आहे.
कोरोनामुळे संगणक, लॅपटॉप, मोबाईलद्वारे विद्यार्थ्यांना सोयीच्या ठिकाणाहून परीक्षा देण्याची मुभा आहे. या परीक्षा सकाळी ९ ते ११, दुपारी १२ ते २ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत होतील. एका सत्रात एकाच वेळी सुमारे ३० हजार विद्यार्थी परीक्षा देतील. या दृष्टीने परीक्षेचे नियोजन केले आहे. प्रॉक्टर्ड पद्धतीनुसार या परीक्षा होतील. त्यामुळे गैरप्रकार करणाऱ्यांवर करडी नजर राहणार आहे. तसेच, यंदा प्राध्यापकांनी प्रश्नसंचाची संख्या वाढवून दिली आहे.
विद्यार्थ्यांनी मॉक टेस्ट द्यावी
द्वितीय सत्राची परीक्षा सुरू होण्यापूर्वी सराव परीक्षा घेतली जाणार आहे. सराव परीक्षा ९ ते १० जुलै रोजी घेण्यात येणार आहे. ऑनलाइन परीक्षेची माहिती होण्यासाठी सर्वसाधारण प्रश्नांवर आधारित सराव परीक्षा होतील.
----
स्टुडंट प्रोफाइल करावी अपडेट
ऑनलाइन परीक्षेदरम्यान येणाऱ्या अडचणी व शंकांचे निराकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी sps.unipune.ac.in येथे लॉग ईन करून तक्रार नोंदवावी. तक्रार योग्य पद्धतीचे असणे आवश्यक आहे. तसेच ऑनलाइन परीक्षा योग्य पद्धतीने होण्यासाठी स्टुडंट प्रोफाइलमध्ये विद्यार्थ्यांनी स्वत:चा इ-मेल आयडी, मोबाईल क्रमांक अपडेट करावेत.
कोट
परीक्षा विभागाने द्वितीय सत्राच्या परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात पदवी आणि पदव्युत्तरच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. १५ ऑगस्टपर्यंत या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करणार आहे. त्यामुळे परदेशात अथवा अन्य संस्थांमध्ये प्रवेश घेण्यास विद्यार्थ्यांना अडचण येणार नाहीत.
- महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ