वाळूमाफियाच्या जाचाचा दुसरा बळी
By admin | Published: April 25, 2015 05:04 AM2015-04-25T05:04:19+5:302015-04-25T05:04:19+5:30
दौैंड तालुक्यात उंडवडी येथे वाळूमाफियांनी मारहाण केल्याने एका युवकाने आत्महत्या केल्याला आठवडा होतो, तोच याच गावातील आणखी एका तरुणाने
राहू : दौैंड तालुक्यात उंडवडी येथे वाळूमाफियांनी मारहाण केल्याने एका युवकाने आत्महत्या केल्याला आठवडा होतो, तोच याच गावातील आणखी एका तरुणाने वाळूमाफियांच्या जाचातून गुरुवारी (दि. २३) आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, आत्महत्या केलेले दोघेही चुलतभाऊ होते. या प्रकरणी चार वाळूमाफियांवर यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दत्तात्रय भोंगळे (वय ३३) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून, यापूर्वी नीलेश भोंगळे याने आत्महत्या केली होती. दत्तात्रय यांच्या मृतदेहावर अंत्यविधी करण्याचा गुपचूप प्रयत्न होता, मात्र पोलिसांनी स्मशानभूमीतून मृतदेह ताब्यात घेतला. दत्तात्रय भोंगळे यांच्या कुटुंबीयांतील रवींद्र भोंगळे यांनी तशी फिर्याद दाखल केली आहे.
यवत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नं. १0८/१५ नुसार भा.दं. वि.क. ३०६, ३४ अन्वये उमेश सोनवणे, रामाभाऊ सोनवणे (दोघेही रा. राहू, ता. दौंड), भाऊ चौधरी (रा. नायगावपेठ) यांसह अन्य एक व्यक्ती (नाव समजू शकले नाही) या चार वाळूमाफियांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मृत दत्तात्रय भोंगळे यांची पत्नी स्वाती यांनी केली आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी, वाळूवाहतुकीसाठी भोंगळे यांनी रस्ता दिला होता. यापोटी रकमेची मागणी करण्यासाठी नीलेश भोंगळे १६ एप्रिल रोजी गेला असता त्याला त्यांनी बेदम मारहाण केली. तेव्हा नीलेशने विषप्राशन करून आत्महत्या केली. हे प्रकरण आर्थिक तडजोड आणि राजकीय दबावापोटी मिटविण्यात माफियांना यश आले असल्याची जोरदार चर्चा होती.
परंतु, हे प्रकरण न मिटविता दोषी वाळूमाफियांवर कारवाई करण्याची मागणी नीलेश भोंगळे याचा चुलतभाऊ दत्तात्रय भोंगळे यांनी केली होती. आपल्या भावाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यावंर कारवाईसाठी तो धडपडत होता. दत्तात्रय भोंगळे यालाही वाळूमाफियांकडून दमदाटी करण्याचा प्रकार घडत होता, असे परिसरात बोलले जायचे. त्यानुसार त्यामुळे त्याने कंटाळून उंडवडी येथे आत्महत्या केली. ही आत्महत्या दत्तात्रय याने स्वत: केली की त्याला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडले, हा प्रश्न गुलदस्तात आहे. (वार्ताहर)