CoronaVirus News: कोरोनाची दुसरी लाट मे अखेरीस ओसरणार; महाराष्ट्रापासूनच होणार सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 06:07 AM2021-04-30T06:07:26+5:302021-04-30T06:10:02+5:30
महाराष्ट्रापासूनच होणार सुरुवात
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : कोरोनाची दुसरी लाट मेच्या तिसऱ्या आठवड्यापासून ओसरण्यास सुरुवात होणार असल्याचा दिलासादायक अंदाज आयआयटी कानपूर आणि हैदराबादच्या वैज्ञानिकांनी ‘सूत्र’ नावाच्या एका प्रारूपाचा वापर करून वर्तविला आहे. याची सुरुवात महाराष्ट्रापासूनच होणार असून, रुग्णसंख्या कमी होणार आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उच्चांक सर्वप्रथम महाराष्ट्राने अनुभवला. त्यामुळे १५ मेनंतर लाट ओसरण्याची सुरुवातही महाराष्ट्रापासूनच होईल, असा अंदाज या गणीतीय प्रारूपाच्या माध्यमातून बांधण्यात आला आहे. यानुसार भारतात १४ ते १८ मे दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या सर्वोच्च बिंदू गाठेल आणि तिसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या कमी होऊ लागेल. वेगवान लसीकरण, नागरिक घेत असलेली काळजी आणि आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा यातूनच दुसऱ्या लाटेवर मात करता येईल, असा विश्वास वैद्यक तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
तिसऱ्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील लाट ओसरायला सुरुवात होईल. दुसऱ्या लाटेच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढली. त्यानंतर इतर राज्यांमध्ये संसर्गाचा वेग वाढला.
- डॉ. सुभाष साळुंखे, सदस्य,
कोरोना कृती समिती, महाराष्ट्र
कोरोना साथीच्या वाढीची अचूक संख्यात्मक मांडणी अद्याप कोणीही करू शकलेले नाही. कोरोनाचा प्रसार डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांच्या काळात कमी का झाला होता, अचानक का वाढला, याबाबत डेटा उपलब्ध नाही. जे आपल्या हातात नाही, त्याबाबत अंदाज बांधण्यापेक्षा जे आपल्या हातात आहे, त्यावर भर द्यायला हवा.
- डॉ. मिलिंद वाटवे,
प्रसिद्ध जैवशास्त्रज्ञ