दुसऱ्या लाटेत पोलीस दलाची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:10 AM2021-05-23T04:10:43+5:302021-05-23T04:10:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेत रस्त्यावर बंदोबस्त करणारे पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यामध्ये बाधितांचे प्रमाण मोठ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेत रस्त्यावर बंदोबस्त करणारे पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यामध्ये बाधितांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले होते. त्यात ५५ वर्षांवरील कर्मचाऱ्यांना एकतर सुट्टी दिलेली अथवा कार्यालयात काम देण्यात आल्याने प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन काम करणाऱ्यांची संख्या अतिशय कमी झाली होती. अशा वेळी विशेष पोलीस अधिकाऱ्यांची तात्पुरती नेमणूक करुन पहिल्या लाटेच्या वेळी पुणे पोलिसांनी वेळ निभावून नेली होती. आता मात्र, दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीलाच योग्य काळजी, टेस्टिंग, ट्रेसिंग आणि तत्काळ ट्रीटमेंट या तीन गोष्टींवर भर देण्यात आला. त्यामुळे दुसर्या लाटेत कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण पोलीस दलात मर्यादित आहे.
पहिल्या लाटेच्या वेळी अनेक पोलीस ठाणे, पोलीस चौक्यांमधील जवळपास सर्व जण क्वारंटाईनमध्ये गेल्याचे प्रसंग घडले होते. मार्चमध्ये दुसर्या लाटेला सुरुवात झाली. तोपर्यंत दररोज २ -३ पोलिसांना लागण होत होती. काही दिवसात ती संख्या १० ते १५ पर्यंत वाढली. हे लक्षात घेऊन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी संसर्ग रोखण्यासाठी एक पथक तयार केले. पोलीस आयुक्तालय, मुख्यालय व पोलीस ठाण्यांमधील सर्वांच्या चाचण्या करुन घेतल्या. लक्षणे नसलेले परंतु बाधित असल्याचे आढळून आलेल्यांचे तातडीने विलगीकरण केले गेले. त्याचबरोबर लसीकरणावर भर देण्यात आला. त्यातून पोलीस दलात दुसर्या लाटेतील बाधितांची संख्या मर्यादित राहिली आहे.
पहिली लाट दुसरी लाट
एकूण पोलीस रूग्ण - १७३० ३५०
एकूण पोलीस मृत्यू - ११ ७
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी औषधे
पोलिसांमधील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी वेगवेगळी आयुर्वेदिक औषधांचा सर्व पोलीस ठाणेस्तरावर पुरवठा करण्यात आला. त्याचबरोबर प्रत्येक पोलीस ठाण्यात नेमण्यात आलेल्या वेलनेस ऑफिसरमार्फत आरोग्यविषयक सूचना सातत्याने पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यापर्यंत पोहचविण्यात आल्या. त्याचबरोबर पोलीस दलातील लसीकरणाचा नियोजनबद्ध कार्यक्रम राबविण्यात आला. त्यामुळे जवळपास ९० टक्के पोलिसांचे लसीकरण करण्यात आले आहे.
सुविधांवर भर
पोलीस तसेच त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली तर त्यांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी पोलीस रुग्णालयात ऑक्सिजन बेडसह सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या. फ्रँटलाईन वर्करसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा १० टक्के कोटा राखून ठेवण्यासाठी शासनाला आदेश काढण्यास प्रतिबंध केले.
.....
मास्क, सुरक्षित अंतर यावर भर
पहिल्या लाटेत मला व कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर लसीकरण केले. दुसर्या लाटेत मास्क आणि सुरक्षित अंतर पाळणे, प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर दिला आहे. पोलीस आयुक्तालयातून सांगण्यात येणार्या सूचनाचे तंतोतंत पालन करण्याचा कटाक्ष असतो.
पोलीस अधिकारी
.......
टेस्टिंग, ट्रेसिंग आणि तत्काळ उपचार या तीन बाबींना प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचबरोबर पोलीस व त्यांच्या कुटुंबियांना उपचारासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध होतील याकडे लक्ष दिले. लसीकरणावरही भर दिल्याने दुसर्या लाटेत पोलीस दलातील संसर्ग कमी होण्यास मदत झाली आहे.
अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर